अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने विधानभवनात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं असतानाच हे गाणं व्हायरल झालं. त्यामुळे राजकीय गदारोळात पडळकरांचा कलात्मक पैलू लोकांना नव्यानं जाणवतो आहे.
भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे सध्या सोशल मीडियावर नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं त्यांचं “मन भरून आलं…” हे गाणं सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि गायिका श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे भावनिक गीत पुन्हा एकदा लोकांच्या ओठांवर आहे.
साक्षी चौधरीसोबतची केमिस्ट्री पुन्हा भावतेय
या गाण्यात गोपिचंद पडळकर यांच्यासोबत अभिनेत्री साक्षी चौधरी हिने भूमिका साकारली आहे. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा भावतेय. सादरीकरण, सिनेमॅटोग्राफी आणि पडळकरांचा दमदार कॉलर डान्स या गाण्याला पुन्हा चर्चेच्या झोतात आणतो आहे.
कॉलर डान्सने पुन्हा केला सोशल मीडियावर कब्जा
या गाण्यातील कॉलर डान्सची विशेष चर्चा होत आहे. अनेकांनी तो डान्स ‘सलमान खानपेक्षा भारी’ असल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओ रील्स, शॉर्ट्स आणि मेम्सच्या माध्यमातून गाण्याचे काही विशिष्ट भाग सतत शेअर केले जात आहेत. त्यातूनच हे गाणं पुन्हा लोकांच्या लक्षात आलं आहे.
सामाजिक माध्यमांवरुन गावकऱ्यांपर्यंत पोहोचणारा ट्रेंड
गावोगावी हे गाणं सध्या मोठ्या प्रमाणावर वाजवलं जात आहे. कार्यकर्ते आणि समर्थकही हे गाणं आपल्या गावात खास प्रसंगांमध्ये लावताना दिसत आहेत. काही ठिकाणी स्थानिक मंडळांनीही या गाण्यावर नृत्य सादर करण्यास सुरुवात केली आहे.