अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आक्रमक तयारी सुरू केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विधानभवनात विदर्भातील आमदारांची बैठक घेतली गेली. या बैठकीत आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांची माहिती दिली, मात्र या बैठकीचा खरा हेतू म्हणजे भाजपच्या संघटनात्मक तयारीला बळ देणे हा होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुंबईत स्वतंत्र बैठक घेऊन पुढील रणनिती जाहीर केली.
८० टक्के मतदान केंद्रांवर ५१ टक्क्यांचे उद्दिष्ट
मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये भाजपने स्पष्ट सूचना दिल्या की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक जिल्हा, मंडळ पातळीवर भाजपच्या उमेदवारांना ८० टक्के मतदान केंद्रांवर किमान ५१ टक्के मते मिळवून द्यावीत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बूथ पातळीवर संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. याद्वारे विरोधकांवर दबाव निर्माण करत सत्ता टिकवून ठेवण्याचा भाजपचा स्पष्ट प्रयत्न आहे.
पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे, संघटनात्मक आदेश
मुंबईतील भाजप राज्य कार्यालयात झालेल्या बैठकीत विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांना त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. बैठकीदरम्यान नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच, प्रत्येक बूथवर ‘बूथ कमिटी’, ‘पन्ना प्रमुख’, ‘शक्ती केंद्र’ यांची रचना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, मंडळ कार्यकारी समित्यांचे पुनर्गठन करणे हेही यामध्ये समाविष्ट आहे.
‘मन की बात’ आणि योजनांचा प्रचार अधिक व्यापक
बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की, देशाच्या पंतप्रधानांचा ‘मन की बात’ कार्यक्रम स्थानिक पातळीवर अधिक प्रभावीपणे पोहचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या सामाजिक कल्याण योजनांची माहिती नागरिकांपर्यंत डिजिटल पद्धतीने पोहोचवावी. त्यातून लोकांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हावी हा उद्देश आहे.
ठाकरे भेटीनंतर नवा राजकीय संकेत?
मुख्यमंत्री फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अधिवेशनात झालेल्या चर्चेची पार्श्वभूमी लक्षात घेता, ही बैठक केवळ संघटनात्मक नसून, एक प्रकारचा राजकीय संदेशही आहे. ठाकरे गटाला पुन्हा सोबत घेण्याच्या चर्चांच्या दरम्यानच भाजपने स्वतःची यंत्रणा अधिक बळकट करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे ही रणनिती म्हणजे ठाकरे गटाला दिलेला एक अप्रत्यक्ष इशाराच म्हणावा लागेल.