अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. यामध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळ विधानभवनाच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
पूर्वीच्या वादाचा स्फोट, मंगळसूत्र चोर वक्तव्य ठरलं ठिणगी
या वादाची पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वीच्या विधानभवनातील घटनेशी जोडली गेली. जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना “मंगळसूत्र चोर” म्हणून हिणवलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. गुरुवारी त्याचा स्फोट झाला आणि समर्थक थेट भिडले.
मार खाल्लेल्या कार्यकर्त्यालाच अटक? आव्हाडांचा आरोप
वादादरम्यान आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली. आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार, मारहाण करून पळून गेलेल्या पडळकर समर्थकांऐवजी पोलिसांनी उलट नितीन देशमुखलाच ताब्यात घेतलं. यावरून आव्हाड यांनी पोलिसांवर तीव्र टीका केली. “मार खाणार आमचा कार्यकर्ता, पण अटक त्यालाच?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पोलीस ठाण्यासमोर रात्रभर ठिय्या, सोशल मीडियावर रोष
या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड थेट पोलीस ठाण्यासमोर गेले आणि आपल्या कार्यकर्त्याला मुक्त करण्यासाठी रात्रभर आंदोलन करत बसले. त्यांनी “माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही” अशी ठाम भूमिका घेतली. यासंबंधित पोस्ट व व्हिडीओ त्यांनी एक्स (माजी ट्विटर) वर शेअर केले असून पोलिसांवर व प्रशासनावर टोकाची टीका केली.
प्रशासनाचा एकतर्फी व सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकाव?
आव्हाड यांनी पोलिस आणि विधानभवन प्रशासनावर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. “मी इतकं सत्ताधाऱ्यांना शरण गेलेलं प्रशासन याआधी कधी पाहिलं नाही,” असे आव्हाड यांनी म्हटलं. त्यांच्या या भूमिकेला सोशल मीडियावरून मोठा पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे, भाजपकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी तणावाची परिस्थिती अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.