अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये महत्त्वाची युती झाली आहे. या युतीची अधिकृत घोषणा शिंदे आणि आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही पक्षांनी ही युती केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या युतीला ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
ही युती जाहीर होताच वंचित बहुजन आघाडीने (वबा) तीव्र प्रतिक्रिया दिली. वंचितच्या म्हणण्यानुसार, ही युती केवळ सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असून, संविधान आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला धोका आहे. त्यांनी आरोप केला की आनंदराज आंबेडकर यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी हातमिळवणी करून, आरएसएसच्या अजेंड्याला अप्रत्यक्षपणे साथ दिली आहे.
वैयक्तिक आणि आर्थिक फायद्याचा आरोप
वंचितने थेट आरोप करत विचारले की, आनंदराज आंबेडकर यांनी वैयक्तिक आणि आर्थिक लाभासाठी ही युती केली आहे का? त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे आंबेडकरी, दलित, मुस्लिम, ओबीसी समाजाची फसवणूक झाली आहे. या युतीमुळे सामाजिक सुधारणांचा मार्ग दुर्बळ होईल आणि बहुजन समाजाची फक्त राजकीय वापरासाठी मोडतोड केली जाईल, असा इशाराही वंचितने दिला.
वंचितकडून भूतकाळाची आठवण
वंचितने रिपब्लिकन सेनेला पूर्वी दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली. त्यांनी नमूद केलं की, आनंदराज यांच्या विनंतीवरूनच वंचितने त्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. मात्र, आता हे संबंध संपवले जात असून, आरएसएस आणि भाजपशी जवळीक असलेल्यांना वंचितकडे जागा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
आनंदराज आंबेडकर यांचा पलटवार
वंचितच्या आरोपांवर आनंदराज आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. कुठलाही वैयक्तिक लाभ मिळवण्यासाठी मी युती केलेली नाही. ही युती कार्यकर्त्यांना सत्तेच्या जवळ आणण्यासाठी आहे. अनेक वंचित कार्यकर्ते आता आमच्याशी संपर्क साधत असून, त्यांनीही वंचितमधील नकारात्मकतेला कंटाळा आल्याचं सांगितलं आहे.