अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
पाटणा| बिहारमधील पाटणामध्ये पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगार चंदन मिश्राची एका नामांकित खासगी रुग्णालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चंदनवर हत्या, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. तो २०११ मध्ये व्यावसायिक राजेंद्र केसरी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. उपचारासाठी पॅरोलवर सुटलेला चंदन १८ जुलै रोजी पुन्हा तुरुंगात जाणार होता. मात्र त्याआधीच गुरुवारी त्याचा खून झाला.
हल्लेखोरांनी कडेकोट सुरक्षा भेदली
पाच सशस्त्र तरुणांनी रुग्णालयात शिरकाव करत थेट चंदनच्या रूममध्ये प्रवेश केला. सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीतही हल्लेखोरांनी कोणतीही अडथळा न येऊ देता गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यामध्ये हल्लेखोर चंदनच्या खोलीत घुसताना स्पष्टपणे दिसत आहेत. ही हत्या रुग्णालयाच्या अत्यंत सुरक्षित परिसरात घडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
टोळी संघर्षातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय
चंदन मिश्राचा माजी साथीदार शेरू सिंह याच्याशी झालेल्या दुश्मनीतून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शेरू आणि चंदन हे आधी एकाच टोळीत होते, पण काही वर्षांपूर्वी त्यांच्यात दुरावा आला आणि शेरू वेगळी टोळी चालवू लागला. आता शेरूच्या टोळीतीलच शूटरने चंदनचा खात्मा केला असावा, असे सूत्रांकडून समजते. या हत्येमागे नेमकं कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
राजकीय प्रतिक्रिया आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न
घटनेनंतर बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी राज्यात अराजकतेचे वातावरण असल्याचे सांगत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. “हॉस्पिटलजवळ पोलीस ठाणे, २०० मीटरवर पोलीस मुख्यालय, तरीही दिवसा हत्या… राज्य सरकार अस्तित्वात आहे का?” असा सवाल पप्पू यादव यांनी उपस्थित केला आहे.
पोलीस तपास सुरू, सीसीटीव्ही फुटेजवरून शोध
हत्येचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले असून त्याआधारे पोलीस तपास करत आहेत. हल्लेखोर कोणत्या मार्गाने आले आणि निघून गेले याचा तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षारक्षकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपास केला आहे.