WhatsApp

संत्र्यांची चमक, कापसाची ताकद : विदर्भाच्या कामगिरीचा देशभर बोलबाला!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
मुंबई |
केंद्र सरकारच्या ‘एक जिल्हा, एक उत्पादन – २०२४’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राने ‘अ’ श्रेणीतील सर्वोच्च सुवर्णपदक पटकावून देशपातळीवर बाजी मारली आहे. नवी दिल्ली येथील ‘भारत मंडपम’मध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. या योजनेत जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास अशा तीन गटांतून पुरस्कार दिले गेले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांनी आपापल्या खास उत्पादनांच्या आधारे उल्लेखनीय कामगिरी करत राज्याचा नावलौकिक वाढवला.



नागपूरच्या संत्र्यांना रौप्य पदक
नागपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध संत्र्यांना कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळून रौप्य पदक मिळाले आहे. हे संत्रे राष्ट्रीय स्तरावर आधीच ओळखले जात होते, आता अधिकृतरित्या त्यांना गौरवही मिळाला आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अमरावतीनेही घेतली चमकदार झेप
अमरावती जिल्ह्यातील मंदारिन संत्र्यांनी कृषी क्षेत्रात तृतीय स्थान मिळवून कांस्य पदक मिळवले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्थानिक स्तरावर उत्पादन होणाऱ्या या फळाला आता राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

अकोल्याच्या कापूस प्रक्रियेचे कौतुक
कापूस प्रक्रिया क्षेत्रात अकोला जिल्ह्याला विशेष उल्लेखनीय राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. ‘जिनिंग’ आणि ‘प्रेसिंग’मध्ये अकोल्याच्या झालेल्या प्रगतीला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. हा पुरस्कार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या वतीने महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी स्वीकारला. अकोला हा अकृषी क्षेत्रात महाराष्ट्रातून सन्मान मिळवणारा एकमेव जिल्हा ठरला.

स्थानिक उत्पादनांचा राष्ट्रीय ब्रँड होण्याचा मार्ग मोकळा
‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या योजनेमुळे स्थानिक विशेष उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणून उभे राहण्याची संधी मिळत आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, शेतकरी, उद्योजक यांना थेट फायदा होणार आहे. सरकारकडून या उपक्रमाचा उद्देशच असा आहे की, जिल्ह्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांमुळे देशाची निर्यात वाढावी आणि रोजगार निर्मिती होण्यास मदत व्हावी.

Leave a Comment

error: Content is protected !!