अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
अकोला | अकोल्यात खोट्या GST बिलांद्वारे तब्बल ९.९७ कोटी रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. प्रत्यक्षात कोणताही मालाचा व्यवहार न होता, केवळ कागदोपत्री खरेदी-विक्री दाखवून त्यावरून टॅक्स क्रेडिट उचलण्यात आले. अकोल्यातील प्रतीक गिरीराज तिवारी या व्यापाऱ्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांनी “स्वामी सार्थ किराणा” या नावाने व्यवसायाची नोंदणी केली होती. पुढे त्यांनी “महालक्ष्मी सेल्स” नावानेही दुसरी नोंदणी करून तीच पद्धत वापरत बनावट बिलांच्या आधारे करोडोंची अफरातफर केल्याचे उघड झाले.
सात व्यापारी आणि दोन परराज्य व्यापाऱ्यांचे नावे संशयाच्या भोवऱ्यात
तपासादरम्यान राज्यातील सात व्यापाऱ्यांनी आणि कर्नाटकातील दोन व्यापाऱ्यांनी तिवारी यांना बनावट बिलं पुरविल्याचं निष्पन्न झालं आहे. या व्यापाऱ्यांनी व्यवसाय न करता फक्त बनावट व्यवहार दाखवले. त्यातून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून सरकारची आर्थिक फसवणूक केली गेली. या प्रकरणात वापरलेली रक्कम पाच कोटींपेक्षा अधिक असल्याने गुन्हा अजामीनपात्र आणि दखलपात्र ठरतो.

GST खात्याचे नियोजनबद्ध पथक आणि कारवाईची आखणी
या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व राज्य कर उपायुक्त एकनाथ पावडे, अमरावती विभागाचे सहआयुक्त संजय पोखरकर, व अन्य अधिकाऱ्यांनी केले. महेशकुमार घारे, अजय तुरेराव व त्यांच्या पथकाने संयुक्त धाड टाकून प्रत्यक्ष पुरावे जमा केले. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
व्यवसाय नसतानाही खोटी बिले कशी तयार झाली?
खामगावमधील आकाश अडचुळे, सज्जन पुरी आणि ग्रोव्हर शाह, अनिस शाह यांच्यासारख्या व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष कोणताही व्यवसाय न करता फक्त बिलं तयार करून तिवारी यांना दिली. या बिलांची नोंद GST पोर्टलवर केली गेली, पण कोणताही खरा व्यवहार झाला नव्हता. कारवाईदरम्यान या व्यापाऱ्यांनीही बनावट बिलांची कबुली दिली.
साखळी तुटली पण प्रश्न कायम
या कारवाईमुळे बनावट GST व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साखळीवर तात्पुरता आळा बसला असला, तरी ही फसवणूक नेमकी कशी शक्य झाली, संबंधित विभागांनी ती वेळीच का ओळखली नाही, यासारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात असे प्रकार वाढत असल्याने आगामी काळात GST खात्याकडून मोठ्या प्रमाणात तपास मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.
