अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि महाराष्ट्रातील मुंबई येथील १४ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. धर्मांतर रॅकेटशी संबंधित संशयित आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी आज पहाटे पाच वाजता ईडीने छापे टाकले. बलरामपूरमधील उत्रौला आणि मुंबईतील वांद्रे, माहीम परिसर यामध्ये ही कारवाई करण्यात आली. ईडीला एका बँक खात्यातून २ कोटी रुपयांचे संशयास्पद हस्तांतरण झाल्याचा पुरावा मिळाला आहे.
५०० कोटींपर्यंत परदेशी निधीचा संशय
छांगूर बाबा ऊर्फ जलालुद्दीन याने मागील काही वर्षांमध्ये धर्मांतरासाठी परदेशी इस्लामिक देशांमधून मोठ्या प्रमाणावर निधी उभारल्याचा संशय आहे. ईडीला अंदाज आहे की, या माध्यमातून सुमारे ५०० कोटी रुपये भारतात आले असावेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निधीतून रॅकेट चालवले जात होते आणि शेकडो महिलांचे धर्मांतर केले गेले.
१०० कोटींहून अधिक संपत्तीची जमवाजमव
छांगूर बाबाकडे आलिशान गाड्या, महागडे बंगले आणि तब्बल तीन डझन मालमत्ता असून त्यांची एकूण किंमत ३०० कोटींहून अधिक आहे. या मालमत्तांपैकी अनेक संस्था, सहकारी आणि एनजीओच्या नावावर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने मागील काही वर्षांत १०० कोटींहून अधिकची संपत्ती उभी केली असून ती संशयास्पद आहे.
परदेश दौरे आणि एनजीओ बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार
छांगूर बाबाने मागील काही वर्षांमध्ये ५० हून अधिक परदेश दौरे केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, त्याच्या स्वयंसेवी संस्थांच्या नावे उघडलेल्या बँक खात्यांमध्ये १०६ कोटींपेक्षा अधिक रकमेचे संशयास्पद व्यवहार आढळले आहेत. पोलिसांचा अंदाज आहे की, या व्यवहारांमागे परदेशी निधी आहे.
धर्मांतर रॅकेट प्रकरणात अटक व गुन्हे
५ जुलै रोजी छांगूर बाबा आणि त्याची सहकारी नसरीन ऊर्फ नीतू रोहरा यांना उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली होती. यापूर्वीच एप्रिल महिन्यात नसरीनचा पती नवीन ऊर्फ जमालुद्दीन रोहरा आणि छांगूर बाबाचा मुलगा मेहबूब यांनाही अटक झाली होती. धर्मांतर विरोधी कायद्यानुसार आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली या आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एटीएसकडून आणखी १४ संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे. छांगूर बाबा मात्र सगळे आरोप फेटाळून स्वतःला निर्दोष असल्याचा दावा करतो.