अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
बंगळुरु | कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या रावला बंगळुरु न्यायालयाने सोनं तस्करी प्रकरणात एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेबरोबरच तिला सध्या कोणताही जामीन मिळू नये, असंही स्पष्ट करण्यात आलं. या प्रकरणामुळे कन्नड सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. रान्या रावला याच वर्षी ५ मार्च रोजी दुबईहून परतताना बंगळुरु विमानतळावर अटक करण्यात आली होती. तिच्या अंगावरून तब्बल १२ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.
दुबईच्या फेऱ्यांनी पोलिसांचं लक्ष वेधलं
रान्या राव गेल्या एक वर्षात वारंवार गल्फ देशात जात होती. विशेषतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तिने चार वेळा दुबईला जाऊन आल्याची नोंद आहे. तिच्या या सततच्या प्रवासामुळे ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. ५ मार्चला जेव्हा ती पुन्हा दुबईहून परतली, तेव्हा तिच्यावर पाळत ठेवलेल्या अधिकाऱ्यांनी तिला थांबवून झडती घेतली. त्यावेळी तिच्या कपड्यांखाली, मांड्या व कंबरेवर लपवलेलं मोठ्या प्रमाणात सोने आढळून आलं.
पोलिस कॉन्स्टेबलच तस्करीस मदत करत होता
तपासात धक्कादायक बाब म्हणजे, रान्या रावला विमानतळातून बाहेर पडण्यासाठी एक पोलीस कॉन्स्टेबलच मदत करत होता. त्याच्याविरोधातही आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रान्याचा पती जतीन हुक्केरी हा नामवंत आर्किटेक्ट असून, त्याचं दुबईत कोणतंही प्रकल्पकार्य सुरू नसल्याचंही निष्पन्न झालं आहे. त्यामुळे रान्या दुबईत खास तस्करीसाठीच जात होती का, याचा तपास सुरू आहे.
३३ वर्षीय अभिनेत्रीचा ग्लॅमर ते गुन्हेगारीपर्यंतचा प्रवास
रान्या राव ही ३३ वर्षांची असून तिने अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर २०१४ मध्ये ‘मानिक्य’ या कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अभिनेता सुदीपसोबत मुख्य भूमिका साकारून तिने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली होती. तिने नंतर कन्नड आणि तामिळ भाषेतही अनेक चित्रपट केले. मात्र यावर्षीच्या अटकेनंतर तिचं नाव सध्या सिनेसृष्टीपेक्षा अधिक गुन्हेगारीच्या चर्चेत आहे.
कोर्टाचा स्पष्ट आदेश: कोणताही जामीन नाही
बंगळुरुच्या विशेष न्यायालयाने रान्याला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावताना स्पष्ट केलं की, तिच्या प्रकारामुळे देशाच्या सीमाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तिचे कृत्य पूर्वनियोजित होते, असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने कोणताही जामीन नाकारला आहे. सध्या तपास अधिक खोलात सुरू असून, या तस्करी रॅकेटमध्ये आणखी कोणी सामील आहे का, हे तपासले जात आहे.