अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली | देशातील सुमारे ९.८ कोटी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतांनुसार, १८ किंवा १९ जुलै २०२५ रोजी ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. मात्र, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जुलै रोजी बिहारमधील मोतिहारी दौऱ्यावर असणार असून, तिथूनच ते या हप्त्याचे वितरण करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
शेतीसाठी मिळणाऱ्या ६ हजार रुपयांचे तीन हप्ते कसे मिळतात?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ₹६००० ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये विभागली जाते — एप्रिल- जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च. यापैकी एप्रिल-जुलै कालावधीसाठीचा २० वा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे.
e-KYC, बँक तपशील अद्ययावत करणे अत्यावश्यक
या योजनेचा लाभ वेळेवर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वाची कार्यवाही तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम e-KYC पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. हे pmkisan.gov.in या वेबसाइटवर OTP द्वारे किंवा जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने करता येते. तसेच, बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असणे, खात्याचे तपशील योग्य असणे (IFSC कोड, खाते क्रमांक इ.) हे देखील आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची खात्री करून घ्या.
‘Farmer Registry’ नोंदणी आता अनिवार्य
नवीन नियमानुसार, केवळ पीएम किसानमध्ये नोंदणी असून चालणार नाही. आता ‘Farmer Registry’ देखील अनिवार्य करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या पोर्टलवर किंवा CSC केंद्रांवर जाऊन ही नोंदणी करता येते. यासाठी ‘Farmer Registry App’ देखील उपलब्ध आहे. ही नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनाच पुढील हप्त्यांमध्ये अडथळा येणार नाही.
तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का, तपासा आणि स्टेटस पाहा
शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन ‘Beneficiary List’ मध्ये आपले नाव तपासणे आवश्यक आहे. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून ही माहिती मिळवता येते. हप्ता जमा झाल्यावर ‘Beneficiary Status’ मध्ये जाऊन रक्कम खात्यात आली की नाही, याची खात्री करता येईल.