अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १६ जुलै २०२५ :- अकोल्यात पुन्हा एकदा दहीहांडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. पाच महिन्यांत दुसऱ्यांदा या ठाण्यातील पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने ठाणेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज आता थोड्या वेळापूर्वीच जिल्ह्यातील दहीहंडा पोलिस ठाण्यातील एका एएसआयने अकोल्याचे एस.पी.अर्चित चांडक,अतिरिक्त एस.पी. आणि अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांधीग्राम येथील कावड मिरवणुकीच्या मार्गाची व नदीवरील घाटाची पाहणी करून “पाठ फिरवता”च चक्क ५०,००० हजार रुपयांची लाच घेऊन “तगडी सलामी” दिली आहे.
दहीहंडा पोलिस स्टेशनला कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे याने एका प्रकरणांत आरोपीला तपासात सहकार्य करण्यासाठी १ लाखाची लाच मागितली होती.परंतु त्यात ५०,००० रुपयांत “मांडवली” होऊन ही रक्कम आज देण्याचे ठरले होते.
अकोला जिल्ह्यातील दहीहांडा पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आलंय, आणि यावेळीही कारण तेच – लाचखोरी. या ठाण्यातील पोलीस कर्मचारी भगवान कांबळे यांनी एका तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात पीडिताने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या डीवायएसपी मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. त्यानुसार कासली फाट्याजवळ एसीबीच्या पथकाने आरोपी भगवान कांबळे यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे, केवळ पाच महिन्यांत या पोलीस ठाण्यातील दुसरा कर्मचारी लाच घेताना पकडला गेला आहे.
या घटना समोर आल्यानंतर ठाणेदाराच्या कार्यपद्धतीवर संशयाचे सावट निर्माण झाले असून, पोलीस खात्यातील शिस्त व पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी केली जात आहे. लवकरच अधिक चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती एसीबीने दिली आहे.