अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | अल्पवयीन मुलींच्या ५० अश्लील चित्रफिती फेसबुकवर अपलोड केल्याच्या प्रकरणात खेरवाडी पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २०२२ मध्ये उत्तराखंडच्या नैनिताल येथे या गुन्ह्याची नोंद झाली होती. आता या प्रकरणाशी संबंधित काही डिजिटल पुरावे वांद्रे (पूर्व) येथून मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफीचे ५० व्हिडीओ अपलोड
२०२२ मध्ये फेसबुकवरून तब्बल ५० बाल अश्लील व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते. हे व्हिडीओ अल्पवयीन मुलींचे असून चाईल्ड पोर्नोग्राफीच्या गुन्ह्यात हे अत्यंत गंभीर मानले जातात. या प्रकरणाची सुरुवातीची चौकशी उत्तराखंडमधील नैनिताल पोलिसांनी केली होती. तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा मागोवा घेतल्यानंतर, या गुन्ह्याचे काही धागेदोरे मुंबईतील वांद्रे परिसराशी संबंधित असल्याचे समोर आले.
वांद्रे येथून झाले डिजिटल अपलोड, आरोपींची ओळख स्पष्ट
नैनिताल पोलिसांनी मिळवलेल्या कॉल डिटेल्स आणि मोबाइल टॉवर लोकेशनच्या आधारे काही व्हिडीओ वांद्रे (पूर्व) येथून अपलोड झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून महिपाल महरा (२०, रा. नैनिताल) आणि आकाशकुमार गुप्ता (२५, रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) या दोघांविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिपाल महराने ९ डिसेंबर २०२२ रोजी रात्री त्याच्या फेसबुक अकाउंटवरून हे व्हिडीओ अपलोड केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
बीएनस कलमांतर्गत गुन्हा नोंद, समांतर तपास सुरु
खेरवाडी पोलिसांनी भारतातील नव्या भारतीय न्याय संहितेच्या (बीएनस) कलम ६७(ब) अंतर्गत हे प्रकरण नोंदवले असून, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील बाल साहित्य प्रसारित केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नैनिताल पोलीस आणि मुंबई पोलीस या प्रकरणाचा समांतर तपास करत असून डिजिटल पुरावे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्यवहारांची छाननी केली जात आहे.
चाईल्ड पोर्नोग्राफी कायद्यांतर्गत शिक्षेची गंभीर तरतूद
भारतात १८ वर्षांखालील मुलांचा अश्लील साहित्य वापर हा अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो. चाईल्ड पोर्नोग्राफीमध्ये व्हिडीओ, चॅट, फोटो, ऑडिओ किंवा कार्टून अशा कोणत्याही स्वरूपातील लैंगिक साहित्याचा समावेश होतो. अशा गुन्ह्यासाठी ३ ते ७ वर्षे शिक्षा आणि ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. पुन्हा गुन्हा केल्यास शिक्षा १० वर्षांपर्यंत वाढवली जाते. सरकारने यासंदर्भातील हजारो संकेतस्थळे बंद केली असून इंटरनेटच्या माध्यमातून असे गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.