WhatsApp

“NCERTच्या नव्या पुस्तकात मुघल इतिहास ‘काळा अध्याय’, वादाला तोंड?”

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
नवी दिल्ली | नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) च्या आठवीच्या नव्या समाजशास्त्राच्या पुस्तकात मुघल इतिहासावर नव्या नजरेने भाष्य करण्यात आलं आहे. ‘Reshaping India’s Political Map’ या प्रकरणात मुघल सत्ताधीशांबाबत थेट व खुलेपणाने भाष्य करताना त्यांना क्रौर्य, धार्मिक कट्टरता आणि लूटमार यासारख्या घटनांशी जोडण्यात आलं आहे. या नव्या मांडणीमुळे शिक्षणक्षेत्रात आणि राजकीय वर्तुळातही चर्चेचा नवा विषय निर्माण झाला आहे.



बाबरवर थेट आरोप – क्रौर्याची टोकाची मांडणी
पुस्तकात बाबरचा उल्लेख “अत्यंत क्रूर आणि निर्दयी शासक” म्हणून करण्यात आला आहे. बाबरने आपल्या सैन्यासोबत अनेक शहरांवर हल्ले करून लोकांची निर्घृण हत्या केली, महिला व लहान मुलांना कैदेत टाकलं, अशी थेट मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे. हे वर्णन केवळ ऐतिहासिक घटनांपुरते मर्यादित न ठेवता त्याच्या वैयक्तिक क्रौर्यावरही प्रकाश टाकतो.

अकबर – सहिष्णुतेच्या आड क्रौर्य?
अकबराच्या शासनकालाबाबत पुस्तकात उल्लेख आहे की त्याने सहिष्णुतेचं धोरण स्वीकारलं होतं. मात्र त्याच्या शासनातही काही वेळा लूटमार, धार्मिक दडपशाही यासारख्या घटना घडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे अकबरबाबतचा पूर्वीचा ‘महान सम्राट’ हा समतोल दृष्टीकोन थोडा झाकोळल्याचे दिसते.

औरंगजेब – मंदिरविध्वंस आणि जिझिया कराचा उल्लेख
औरंगजेबाच्या संदर्भात पुस्तकात मंदिरं व गुरुद्वारे तोडण्यात आल्याचा उल्लेख आहे. बिगर मुस्लिमांवर ‘जिझिया’ कर लादण्यात आल्याचेही ठळकपणे नमूद केले आहे. हिंदू, बौद्ध, जैन धर्मीयांवर अन्याय झाला आणि त्यांना धर्म बदलण्यास प्रवृत्त करण्यात आलं, असंही स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.

इतिहासात मुघल ‘काळा अध्याय’ म्हणून वर्णन
पुस्तकात मुघल काळाला “इतिहासातील काळा अध्याय” म्हटलं आहे. त्यात, “आजच्या काळात त्या घटनांसाठी कोणाला जबाबदार धरता येणार नाही” असंही नमूद करत ऐतिहासिक घटनांची जबाबदारी कोणावरही न थोपवता त्याचा वस्तुनिष्ठ उल्लेख केल्याचा दावा केला गेला आहे. मात्र ही मांडणी वादग्रस्त ठरण्याची चिन्हं आहेत.

इतर उल्लेख – खिलजी, मलिक काफूर व मंदिरांवरील हल्ले
पुस्तकात अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याने दक्षिण भारतातील अनेक मंदिरांवर केलेले हल्ले, मूर्ती फोडणे आणि लूटमार याचाही तपशीलवार उल्लेख आहे. मुघल सैन्याने विविध धार्मिक स्थळांवर लुटालूट केली आणि धार्मिक अपमान केला, यावरही भर देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!