अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली | भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने मुलांच्या आधार कार्ड संदर्भात महत्त्वाचा नियम लागू केला आहे. ५ वर्षांपेक्षा कमी वयात आधार घेतलेल्या मुलांनी ७ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक अपडेट करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. जर बायोमेट्रिक अपडेट वेळेत न केल्यास त्या मुलाचा १२ अंकी आधार क्रमांक निष्क्रिय होऊ शकतो, असा इशारा UIDAI ने अधिकृत निवेदनात दिला आहे.
पालकांसाठी सक्तीची प्रक्रिया
UIDAI ने ‘Mandatory Biometric Update’ (MBU) प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मुलांच्या आधारशी लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर मेसेज पाठवले जात आहेत. पालकांनी या सूचनेनुसार मुलाचे बायोमेट्रिक तपशील जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन अपडेट करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य आहे.
काय असतो बायोमेट्रिक अपडेट?
५ वर्षांपेक्षा कमी वयात आधार घेतलेल्या मुलांचे केवळ फोटो, नाव, जन्मतारीख, लिंग आणि पालकांचा आधार क्रमांक वापरून आधार कार्ड तयार केले जाते. परंतु वयानुसार मुलांचा चेहरा, बोटांचे ठसे आणि डोळ्यांची रचना बदलत जाते. म्हणून ७ वर्षे पूर्ण झाल्यावर नव्याने बायोमेट्रिक माहिती गोळा करणे आवश्यक असते. यामुळे पुढे शाळा प्रवेश, सरकारी योजना, बँकिंग प्रक्रिया आदींसाठी अचूक ओळख सुनिश्चित केली जाऊ शकते.
आधार निष्क्रिय होण्याचा धोका
जर बायोमेट्रिक अपडेट वेळेत केले गेले नाहीत, तर UIDAI त्या आधार क्रमांकाला ‘निष्क्रिय’ ठरवू शकते. यामुळे आधारशी संबंधित कोणतीही सेवा – बँक खाते उघडणे, शिष्यवृत्ती मिळवणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे अशक्य होऊ शकते. त्यामुळे पालकांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
सरकारी स्पष्टीकरण
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया फक्त एकदाच करावी लागते आणि पुढील काळात आधारची वैधता कायम राहते. पालकांनी लवकरात लवकर जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.