WhatsApp


लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?

Share

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ :- लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम १३ मार्चनंतर जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

निवडणूक आयोगाकडून तयारीची आढावा सुरु
या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाकडून विविध राज्यांमध्ये सध्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना काय अडचणी आहेत या जाणून घेतल्या जात आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स अर्थात इव्हीएम्स, सुरक्षा रक्षकांची गरज तसेच राज्यांच्या सीमांवर देखरेखीसाठीची तयारी यासांरख्या बाबींचा यामध्ये समावेश आहे.

१३ मार्चनंतर घोषणेची शक्यता
दरम्यान, निवडणूक आयोगाची टीम पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पुढच्या आठवड्यात भेट देणार आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरला देखील १३ मार्च रोजी भेट देणार आहे. त्याचबरोबर १३ मार्चपर्यंत सर्व राज्यांच्या निवडणूक तयारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

यंदा ९७ कोटी मतदार ठरले पात्र
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ९७ कोटी मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये ६ टक्क्यांनी नव्या मतदारांची वाढ झाली आहे. तसेच सुमारे २ कोटी नव मतदारांचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती नुकतीच निवडणूक आयोगानं जाहीर केली होती.

Leave a Comment

error: Content is protected !!