अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
अकोला| अकोल्यातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, नाट्यसमीक्षक, लेखक आणि विदर्भ साहित्य संघाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. पंढरीनाथ मांडवगणे यांचे आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विदर्भाच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक, नामवंत वक्ते, लेखक, नाट्यसमीक्षक आणि विदर्भ साहित्य संघाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले प्रा. पंढरीनाथ मांडवगणे यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते.
मागील तीन महिन्यांपासून त्यांच्यावर पोटाच्या आजारासाठी उपचार सुरू होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिताबाई आर्ट्स कॉलेजमधून ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांची नोंद विदर्भातील खऱ्या अर्थाने विचारवंत साहित्यिकांमध्ये घेतली जाते.
ज्ञानेश्वरीचे सखोल अभ्यासक म्हणून त्यांना विशेष मान्यता होती. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना अध्यात्म, साहित्य आणि नाट्यविचारांची गोडी लावली. न्युइंग्लिश स्कूलसह अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या जाण्याने एक युग संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे आणि मोठा कुटुंबीय परिवार आहे. अकोल्यात त्यांच्या कार्याची छाया अजूनही अनेक संस्थांवर आहे. त्यांच्या आठवणींचा सुवर्णसाठा अकोला शहराच्या संस्कृतीत सदैव जिवंत राहील. ANN News Network परिवारा कडून ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, नाट्यसमीक्षक, लेखक अकोल्यातील बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली