अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | 5 जुलै रोजी मुंबईत झालेल्या मराठी माणसाच्या एकजुटीच्या मेळाव्यानंतर विविध माध्यमांतून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या. काही वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी या भेटीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून थेट उत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की, 5 जुलैचा कार्यक्रम हा निव्वळ मराठी माणसाच्या विजयाचा उत्सव होता. युतीसंबंधी कोणतीही चर्चा झाली नव्हती. मात्र, काही इंग्रजी व मराठी वृत्तपत्रांनी त्यांच्या तोंडी खोटं विधान घालून युती महापालिकेपूर्वी जाहीर होईल, अशा बातम्या प्रसिद्ध केल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अनौपचारिक संवादाचं राजकारण नको
राज ठाकरे पुढे म्हणाले की, 14 आणि 15 जुलै रोजी इगतपुरीत मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्यात मेळाव्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी फक्त “युतीच्या गप्पा तुमच्याशी करायच्या का?” इतकंच खोचक विधान केलं होतं. याचा अर्थ राजकीय युती झाला, असा लावून बातम्या प्रसिद्ध करणे चुकीचं असल्याचं ते म्हणाले.
“अनौपचारिक गप्पा म्हणजे गप्पाच!”
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले, “अनौपचारिक गप्पा तशाच ठेवायच्या असतात. मी जे बोललोच नाही, ते माझ्या नावाने सांगणं ही पत्रकारितेची अधोगती आहे.” काही पत्रकार हे कोणाच्यातरी इशाऱ्यावर खोट्या बातम्या पसरवत आहेत असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारितेशी जुना संबंध
राज ठाकरे यांनी पत्रकारितेशी असलेली आपली जुन्या काळातील घनिष्ठ नाळही यावेळी अधोरेखित केली. “1984 पासून पत्रकारितेशी थेट संबंध आहे. माझं बालपण विविध साप्ताहिकं आणि वृत्तपत्रांच्या संपादन प्रक्रियेत गेले. मी स्वत: अनेक प्रकाशनांत व्यंगचित्रकार म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळे योग्य आणि दर्जेदार पत्रकारिता काय असते, याची पूर्ण जाणीव आहे,” असे त्यांनी सांगितले.
युतीबाबत अंतिम स्पष्टता
राजकारणासंबंधी कोणतीही महत्त्वाची भूमिका घेताना स्वत:च पत्रकार परिषद घेईन, असं स्पष्ट करत राज ठाकरे यांनी अफवांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, “सध्याही अनेक प्रामाणिक पत्रकार आणि संपादक कार्यरत आहेत. माझं म्हणणं त्यांना नक्कीच समजेल.”
या वक्तव्याने केवळ युतीच्या अफवांना पूर्णविराम मिळालेला नाही, तर सध्याच्या पत्रकारितेतील बेपर्वा प्रवृत्तींनाही एक प्रकारचा इशारा दिला गेला आहे.