WhatsApp

अकोल्याच्या उद्योजकाचा गोव्यात राष्ट्रीय परिषदेत सन्मान; योगेश बियाणी यांच्याकडून अभिनव आज्ञावलीची निर्मिती

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
अकोला |
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कमी वेळेत संकल्पनेचे आकलन होऊन कौशल्य विकासासाठी साह्य करेल अशी आज्ञावली (सॉफ्टवेअर) व ॲप्लिकेशन्स अकोल्याचे उद्योजक योगेश युगलकिशोर बियाणी यांनी निर्माण केले आहे. त्यांच्या ‘स्टार्टअप’ला गोव्यातील ‘गोवा इनोवेशन मार्केट असेस २०२५’ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले.  



त्याचप्रमाणे, या संकल्पनेचे ‘पेटंट’ही श्री. बियाणी यांना मिळाले असून, या नाविन्यपूर्ण संकल्पनेबद्दल केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘स्टार्टअप महाकुंभ २०२५’मध्येही त्यांना गौरविण्यात आले आहे. आज्ञावलीसाठी व्हिएतनाममधील ‘व्हीडीबीसी’ या कंपनीनेही श्री. बियाणी यांच्यासह करार केला आहे. ‘इंजिनिअरिंग ड्रॉईंग आणि डिझाईन’ या विषयावरील पहिले ॲप त्यांनी विकसित केले आहे. ‘डिझाईन वर्क स्टेशन’ हे त्यांचे स्टार्टअप अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीत सुरू आहे.

संशोधनाबाबत सांगताना श्री. बियाणी म्हणाले की, चित्रकला ही अभियांत्रिकीची मूलभूत भाषा आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना चित्र, आकार, डिझाईन, तांत्रिकदृष्ट्या अचूक रचना, जटिल रचना अशा संकल्पनांचे सुलभ आकलन व्हावे यासाठी आज्ञावली व ॲप्लिकेशन विकसित केले आहे. आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर, तसेच उद्योगांना कौशल्य विकासासाठी त्याचा लाभ होतो. अभियांत्रिकीत आकार व रचनेबाबत संकल्पनांचे सुलभीकरण, व्हिज्युअलायझेशन याबाबत ॲप्लिकेशन मदत करते. २ डी व ३ डी प्रतिमा निर्माण करणे शक्य होते. ‘डिझाईन वर्क स्टेशन’ हे त्यांचे स्टार्टअप असून, ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. 

Leave a Comment

error: Content is protected !!