अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
अकोला | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित ’प्लेसमेंट ड्राइव्ह’मध्ये आज ५३ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त कार्यालयात विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. कौशल्य विकास व रोजगार सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके अध्यक्षस्थानी होते. कौशल्य विकास अधिकारी नागेश देशपांडे, अजय चव्हाण, प्रफुल्ल दास आदी उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल कौशल्याद्वारे युवकांचे सक्षमीकरण अशी यंदा जागतिक युवक कौशल्य दिनाची थीम आहे. जिल्ह्यात सातत्याने प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन होत असून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे श्री. शेळके यांनी यावेळी सांगितले.
विशेष मेळाव्यात पाच उद्योगांनी सहभाग घेतला. एकूण 110 पदांसाठी मागणी होती. त्यासाठी 151 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यातील 53 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
इनॉट्रो मल्टीसर्विसेस, स्वीगी, सोपन्झा सर्विसेस, उत्कर्ष स्मॉल फायनान्स व भारतीय जीवन विमा महामंडळ यांनी मेळाव्यात सहभाग घेतला. निवड झालेल्या काही उमेदवारांना निवडपत्रे देण्यात आली. शुभांगी ठोसरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रफुल्ल दास यांनी आभार मानले.