अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
वॉशिंग्टन |भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा थरारक अंतराळ प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, त्यांनी १८ दिवसांची शास्त्रीय मोहिम पार पाडल्यानंतर पृथ्वीवर यशस्वी लँडिंग केलं आहे. स्पेसएक्सच्या ‘ड्रॅगन’ अंतराळयानाने त्यांना घेऊन आज दुपारी अंदाजे ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘स्प्लॅशडाऊन’ केले. त्यांच्यासोबत आणखी तीन अंतराळवीर होते.
प्रवासाची कालमर्यादा व यशस्वी लँडिंग
१४ जुलै रोजी संध्याकाळी ४.४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) पृथ्वीच्या दिशेने हे अंतराळयान निघाले होते. सुमारे २३ तासांच्या प्रवासानंतर त्यांनी लँडिंग केले. या मोहिमेमध्ये त्यांनी ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांचे नमुने, माहिती आणि उपकरणांसह ५८० पौंडांहून अधिक वजनाचे संशोधन साहित्य पृथ्वीवर परत आणले.
प्रयोग, संशोधन आणि नवे क्षितिज
या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला यांनी मायक्रोअल्गी या सूक्ष्म वनस्पतीवर प्रयोग केले. यामध्ये अन्न, ऑक्सिजन आणि इंधनाच्या उत्पादनात वापर होणाऱ्या संभाव्य स्रोतांचा अभ्यास केला गेला. अंतराळात या वनस्पतींचे वर्तन, वाढ व टिकाव यावर सखोल अभ्यास करण्यात आला. भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ प्रवासात अशा वनस्पती मोलाची भूमिका बजावू शकतात, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
तांत्रिक टप्पे आणि यशस्वी नियंत्रण
अंतराळस्थानकातून सुटका झाल्यानंतर ड्रॅगन अंतराळयानाने दोन ‘सेपरेशन बर्न्स’ पार केल्यानंतर चार ‘डिपार्चर बर्न्स’च्या माध्यमातून सुरक्षित अंतर राखून यशस्वीरीत्या पृथ्वीच्या दिशेने मार्गक्रमण केले. यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना विविध तापमान आणि दाबांचे टप्पे पार केले.
‘स्प्लॅशडाऊन’नंतरची पुढील प्रक्रिया
स्प्लॅशडाऊन झाल्यानंतर आता शुक्ला यांचा पुनर्वसन कार्यक्रम सुरू होणार आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी पुन्हा सवय होण्यासाठी त्यांच्यावर सुमारे ७ दिवस वैद्यकीय देखरेख आणि रिहॅबिलिटेशन सुरू राहील. त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासलं जाणार आहे. या काळात त्यांचे अनुभव आणि प्रयोगांचा सविस्तर अभ्यासही केला जाणार आहे.
मिशनचं महत्त्व आणि पुढील दिशा
स्पेसएक्स आणि नासाच्या या संयुक्त मोहिमेने केवळ मानवी अंतराळप्रवासाची एक नवीन दिशा दाखवली नाही, तर पृथ्वीबाहेरील जीवनसंभाव्यतेच्या संशोधनात नवा अध्याय सुरू केला आहे. मायक्रोअल्गीसारख्या जैविक स्रोतांचा अभ्यास हे दर्शवतो की भविष्यात अंतराळात मानवी वस्ती स्थापन करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरू शकतो.