अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
अकोला | महाराष्ट्रात मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या पाच भीषण घटनांनी विवाहसंस्थेच्या मूलभूत रचनेलाच हादरा दिला आहे. विवाहबाह्य संबंध आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंती, फसवणूक, हट्ट आणि हिंसेचं चित्र भयावहपणे स्पष्ट होत आहे. पती-पत्नीचं नातं विश्वासावर आधारित असतं, परंतु या घटनांनी दाखवून दिलं की भावनिक फसवणूक, कपट आणि वासनांधता यामुळे कोणतंही नातं टिकू शकत नाही. विशेष म्हणजे, या घटनांमध्ये खून, आत्महत्या, बनाव, लपवाछपवी यांचा इतका अतिरेक झाला की संपूर्ण समाज सुन्न झाला.
साताऱ्यातील प्रकरण:
९ जुलै २०२५ रोजी, पूजाचे तिच्या प्रियकराने केलेल्या खूनाने सातारा हादरला. पूजा जाधव विवाहित होती. तिने अक्षय साबळे याला लग्नास नकार दिला. पण पूर्वीचे संबंध, एकतर्फी प्रेम, आणि सततच्या संवादामुळे निर्माण झालेल्या भावनिक गुंत्याचा शेवट तिच्या हत्येत झाला. पोलिसांनी अक्षयला पुण्यातून अवघ्या १२ तासांत अटक केली.
नागपूरचा खून:
७ जुलै २०२५ रोजी नागपुरात आजारी पतीचा खून पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या संगनमताने झाला. दीक्षा रामटेके आणि आसीफ राजा यांनी मिळून चंद्रसेन रामटेके याचा खून केला. दीक्षा कर्ता बनून कुटुंब चालवत असताना तिचं प्रेम प्रकरण इतकं गंभीर झालं की तिने आजारी नवऱ्याला संपवलं. पोलिसांनी त्यांना अटक केली.
पुण्याची दुहेरी हत्या:
२५ जून २०२५ रोजी पुण्यात तळवडे येथे एका महिलेसह पुरुषाची दगडाने ठेचून हत्या झाली. मंगला टेंभरे आणि जगन्नाथ सरोदे हे प्रेमसंबंधात होते. परंतु या संबंधांचा शेवट खूनात झाला. पोलिसांनी मंगळाच्या प्रेमी दत्तात्रय साबळेला अटक केली. हा गुन्हा अत्यंत निर्दयतेने केला गेला.
मुंबईतील मालाड प्रकरण:
११ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्नी आणि तिच्या प्रियकराने नवऱ्याला संपवलं. राजेश चौहान दारूच्या आहारी गेलेला होता. याच काळात त्याच्या पत्नीचे आणि इम्रान या मित्राचे संबंध निर्माण झाले. दोघांनी मिळून राजेशला दारू पाजून, चाकूने मारून हत्या केली आणि बेपत्ता झाल्याचा बनाव केला. पण पोलिस तपासात हा कट उघड झाला.
बुलढाण्यातील पेनटाकळी खून:
आशा गायकवाड या विवाहितेचा मृतदेह पेनटाकळी धरणात सापडल्यावर आत्महत्या म्हणून सुरुवातीला तपास झाला. पण नंतर तिचा दीर मधुकर गायकवाड याने प्रेमसंबंध, बनावट विवाह, आणि सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून तिचा खून केल्याचं उघड झालं. पोलिसांनी आरोपीकडून सविस्तर कबुली घेतली.
सामाजिक वास्तव आणि प्रश्नचिन्ह
या घटना काही अपवाद नाहीत. बदलती सामाजिक रचना, मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक, व्यक्तिस्वातंत्र्याचं चुकीचं आकलन, आर्थिक अडचणी, मानसिक अस्थैर्य यामुळे विवाहबाह्य संबंधांची शक्यता वाढली आहे. परंतु प्रेमाचं नातं जेव्हा धोका, हट्ट आणि खोटेपणाच्या आधारावर उभं राहतं, तेव्हा त्याचा शेवट बहुधा हिंसेत होतो, हे या घटनांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.
पोलिस तपास यामध्ये कौतुकास्पद असून, बहुतांश प्रकरणांत काही तासांतच आरोपींचा छडा लावण्यात यश आलं आहे. मात्र, एक समाज म्हणून ही वैयक्तिक पातळीवरची उद्रेकात्मकता रोखणं हे आता काळाची गरज आहे.