अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
बुलढाणा | जिल्ह्यातील पेणटाकळी धरणाजवळ आत्महत्येप्रमाणे उघड झालेली घटना प्रत्यक्षात एका थरारक प्रेमसंबंधातून घडलेली हत्या असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. दिर आणि वहिनी यांच्यातील अनैतिक संबंध, पैशाच्या मागण्या आणि वादाचे पर्यवसान अखेर गळा आवळून झालेल्या खुनात झाले.
प्रारंभिक तक्रारीनुसार आत्महत्या, पण पोलिसांनी उकलले धक्कादायक सत्य
७ जुलै रोजी नायगाव खुर्द येथील विवाहित महिला आशा किशोर गायकवाड हिने पेणटाकळी धरणात उडी मारून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. तिच्या भावाच्या फिर्यादीवरून पती किशोर गायकवाड, सासू, सासरा आणि दिर मधुकर गायकवाड यांच्या विरोधात अमडापूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसी खाक्या आणि आरोपीच्या कबुलीजबानीमुळे प्रकरणाला कलाटणी
पोलिसांच्या कसून चौकशीनंतर आणि तपास अधिक खोलात गेल्यानंतर आरोपी दिर मधुकर गायकवाड याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, मागील तीन वर्षांपासून मृत महिला आशासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. या काळात त्याने आशाला मोटारसायकलवरून अनेक ठिकाणी फिरवले, तिच्याशी मंदिरात जाऊन लग्न केल्याचा बनाव केला. तोच मंगळसूत्र त्याने घालून दिले. आशा त्याच्याकडून वारंवार पैशांची मागणी करत होती, त्यामुळे तो वैतागला होता.
खूनाची आखणी आणि अंमलबजावणी
२९ जून रोजी शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी आशा, तिचा पती आणि मधुकर तिघेही गेले होते. दुपारी सुमारास पतीला हात करत ‘घरी जाते’ असे सांगून आशा निघाली. तिच्या पाठोपाठ मधुकरही निघाला. रस्त्यात गाठून दोघे पुन्हा शेताच्या दिशेने वळाले. पेणटाकळी धरणाच्या जवळ आल्यावर मधुकरने आपल्या बरोबर आणलेली दोरी काढून ‘मारु का गंमत’ असा प्रश्न केला, त्यावर आशाने गंमतीतच होकार दिला.
पण गंमत खरी ठरली नाही. मधुकरने दोन्ही हाताने तिचा गळा आवळला आणि खून केला. प्रेत धरणात टाकून, वर दगड ठेवून ते पाण्याखाली दाबून ठेवले, जेणेकरून कोणालाही सापडू नये. तिची टिफिन पिशवी, चप्पल आणि गळा आवळण्यासाठी वापरलेली दोरीही पाण्यात फेकून दिली.
तपासात निष्पन्न झालेले वास्तव
या प्रकरणातील सर्व तपशील आरोपीच्या कबुलीजबानीतून उघड झाले असून, तपासादरम्यान पोलिसांनी सर्व वस्तू आणि पुरावे जमा केले आहेत. सदर गुन्हा हे केवळ आत्महत्या नसून पूर्णतः नियोजनबद्ध खून होता, हे तपासात निष्पन्न झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार निखिल निर्मळ हे तपास करत आहेत.
प्रेमसंबंध, गैरसमज आणि खून – ग्रामीण भागातील सामाजिक वास्तव
या घटनेतून ग्रामीण भागातील लैंगिक शोषण, छळ, मानसिक ताण आणि अनैतिक संबंध यांचा समाजावर होणारा परिणाम अधोरेखित होतो. दिर वहिनीच्या नात्यातील मर्यादा ओलांडल्यावर काय परिणाम होतो, हे या घटनेतून स्पष्टपणे दिसून आले आहे. बेकायदेशीर प्रेम, लग्नाचा बनाव, आणि अखेरीस खून – ही मालिका समाजात खळबळ उडवणारी आहे.