अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई | भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. विजय चौधरी आणि मच्छिंद्र धुमाळ यांच्या ‘श्री गणेश मुव्ही क्रिएशन्स’ निर्मित, रवी निंबाळकर दिग्दर्शित ‘८७ रुपयांचा शाईचा पेन’ या बालचित्रपटाची निवड रशियामधील ‘झिरो प्लस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५’ मध्ये ‘इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या श्रेणीत झाली आहे. विशेष म्हणजे, भारतामधून फक्त हाच एक चित्रपट या प्रतिष्ठित महोत्सवासाठी निवडला गेला आहे.
🧒 साईराज सरडेच्या अभिनयाचं आंतरराष्ट्रीय कौतुक
या चित्रपटात नवोदित बालकलाकार साईराज सरडे याने प्रमुख भूमिका साकारली आहे. एका शाईच्या पेनाभोवती फिरणारी कथा, बालसुलभ भावभावनांचा सहज, प्रामाणिक स्पर्श आणि अभिनयातली नैसर्गिकता यामुळे साईराजने हा चित्रपट अधिक उठावदार केला आहे. साईराजचं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असल्याने, त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
📽️ तंत्रज्ञानाची उत्कृष्ट हाताळणी
चित्रपटाचे छायांकन हरीष सुकूमारन (केरळ) यांनी केले असून, चित्रपटाची दृश्यरचना प्रेक्षकांना अनुभवात्मक ठरेल अशी त्यांची बाजू आहे. संकेत आवळे आणि ऋषिकेश मराठे यांच्या लेखणीतून या कथेला एक भावनिक आणि सशक्त प्रवाह मिळाला आहे. त्यात ऋषिकेश चव्हाण यांच्या संकलनाने कथेतील टोकदार क्षण अधिक ठळक झाले असून, महेश नाईक यांच्या साउंड डिझाईनने चित्रपटाला जागतिक दर्जाचा टच मिळवून दिला आहे.
🌐 महोत्सवाची पार्श्वभूमी
‘झिरो प्लस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ हा रशियातील एक अत्यंत मानाचा चित्रपट महोत्सव आहे, जो ऑक्टोबर २०२५ मध्ये तैमन शहरात आयोजित होणार आहे. जगभरातून निवडक बालविषयक चित्रपटांना या महोत्सवात स्थान दिलं जातं. भारतातून एकमेव चित्रपट म्हणून ‘८७ रुपयांचा शाईचा पेन’ ची निवड झाल्यामुळे भारतीय बालचित्रपट क्षेत्रासाठी हे मोठं यश मानलं जात आहे.
🎤 निर्मात्यांचे मत
निर्माते विजय चौधरी आणि मच्छिंद्र धुमाळ म्हणाले, “आम्हाला गर्व आहे की, एक लहानशा कल्पनेवर आधारित आपला चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. हे यश केवळ आमचं नाही, तर संपूर्ण भारतीय चित्रपट क्षेत्राचं आहे.”