WhatsApp

गडकरींचं जातिविषयक वक्तव्य चर्चेत, “महाराष्ट्रात ब्राह्मणांना फारसं महत्त्व नाही” – उत्तर भारताशी तुलना

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
नागपूर | सडेतोड बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी त्यांच्या जातीचा – ब्राह्मण समाजाचा – उल्लेख करत, “महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना फारसे महत्त्व नाही,” असे वक्तव्य केल्याने अनेक राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे.




🧑‍🏫 शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करताना…

गडकरी म्हणाले, “शिक्षण ही आपली खरी शक्ती आहे. कोणताही समाज शिक्षणाशिवाय प्रगती करू शकत नाही. ट्रक चालवणारे, चहा टपरी चालवणारे अनेक लोक दिसतात, त्यांच्याकडे कौशल्य आहे, पण शिक्षणाची कमतरता त्यांना पुढे जाऊ देत नाही.”

तसेच त्यांनी म्हटलं की, “पदवी अभ्यासक्रमात मिळालेली गुणवत्ता यादी ही यशाचं प्रमाण नाही. मी स्वतः विधीशिक्षण घेत असताना मागच्या बाकावर बसायचो, पण आज अनेक असेच विद्यार्थी मोठे वकील झाले आहेत.”


🧬 “मी ब्राह्मण आहे, पण…”

गडकरींनी स्वत:चा उल्लेख करत स्पष्ट सांगितलं, “मी ब्राह्मण आहे. पण महाराष्ट्रात आमच्या जातीचं फारसं राजकारणात चालत नाही. उत्तर भारतात मात्र आमच्या समाजाचं वजन आहे. दुबे, चतुर्वेदीसारख्या लोकांची मोठी चलती आहे.”

त्यांनी पुढे एक किस्सा सांगितला, “उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात मी गेलो होतो. तिथे एका वक्त्याने म्हणलं – अटल बिहारी वाजपेयींनंतर आमच्या समाजात गडकरींचा आम्हाला अभिमान वाटतो. पण मी त्यांना थेट सांगितलं – मी केवळ तुमचा नाही, सगळ्यांचा आहे.


🔁 धर्म आणि जातीच्या पलीकडे जाण्याचा संदेश

गडकरींनी आपल्या विधानात स्पष्टपणे नमूद केलं की, ते कुठल्याही जाती, धर्माचा आग्रह ठेवत नाहीत. “मी जात-पात मानत नाही. माझं राजकारण, माझं कार्य सर्वसामान्य जनतेसाठी आहे,” असं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.


🔍 भाषेवरूनही स्पष्ट भूमिका

सद्यस्थितीत हिंदी-इंग्रजी वादावरही गडकरींचं मत ठाम आहे. त्यांनी म्हटलं की, “सर्व भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. इंग्रजी शिकायला लाज वाटण्याचं कारण नाही. भाषेवरून कोणतंही अपमानास्पद वक्तव्य होऊ नये.”


🗣️ राजकीय प्रतिसादाची शक्यता

गडकरींचं हे वक्तव्य सार्वजनिक मंचावर आल्यानंतर, राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्रातील जातीय समीकरणं आणि नेतृत्व पातळीवर होणारे बदल यामध्ये हे विधान चर्चेचा विषय ठरू शकतं.

Leave a Comment

error: Content is protected !!