अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
पाटणा | बिहारमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत असतानाच, सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना घडली आहे. शेखपूरा गावातील भाजप पदाधिकारी सुरेंद्र केवट यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे.
📍 नेमकं काय घडलं?
घटना बिहटा सरमेरा महामार्गालगत घडली. भाजप पदाधिकारी सुरेंद्र केवट आपल्या शेतातील पंप बंद करण्यासाठी गेले होते. पंप बंद करून घरी परतत असताना, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्यांचा मारा केला. केवट यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले.
🔍 पोलिसांचा तपास सुरू, सीसीटीव्ही स्कॅन
या घटनेनंतर पोलीस विभागाने तपासाला गती दिली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत. तसेच केवट यांचे राजकीय आणि वैयक्तिक शत्रुत्व यासंबंधीही चौकशी केली जात आहे. अद्याप कोणत्याही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही.
🗣️ राजकीय टीका सुरु, तेजस्वी यादव आक्रमक
या घटनेनंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं, “राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. भाजपचाच पदाधिकारी गोळ्यांवर उडवला जातोय आणि सरकार गप्प आहे. उपमुख्यमंत्री काय करतायत याची कुणालाच कल्पना नाही.”
🏛️ निवडणूकपूर्व हिंसाचाराची मालिका?
याआधी काही दिवसांपूर्वी बिहारमधील प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या झाली होती. आता पुन्हा भाजप नेत्यावर हल्ला झाल्याने राजकीय हिंसाचाराची मालिका सुरु झाली की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. राजकीय हत्याकांडाचा निवडणूक प्रचारावर आणि मतदारांवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.