अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
✍️ मुंबई | सद्याच्या पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक २०२५’ विधानसभेत मांडताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं भाषण आणि त्यातील सडेतोड विधानं सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या विधेयकात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, शिक्षा अशी असावी की ती व्यक्ती आयुष्यभर आणि पुढच्या जन्मातही दारू पिण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल!
⚖️ “नशा एका मिनिटात उतरावी अशी शिक्षा हवी!” — मुनगंटीवार
विधानसभेत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना अशा प्रकारची शिक्षा द्यायला हवी की, एका मिनिटात नशा उतरली पाहिजे. देहदंड देणे शक्य नसले तरी मानसिक व सामाजिक दृष्टिकोनातून कडक कारवाईची आवश्यकता आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता, गोंधळ, महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणारे हे दारुड्यांचे प्रकार निषेधार्ह आहेत. विशेषतः शिवाजी महाराजांचे किल्ले, धार्मिक स्थळे, सार्वजनिक उद्याने इथे दारू पीणे अत्यंत लज्जास्पद आहे.”
🏛️ “दारूचा मोक्ष? मग पिऊनच घरी राहा!”
भाजप नेत्यांनी काही दारू दुकानांच्या नावांचा उदाहरण देत सडेतोड टीका केली. “‘संस्कार देशी दारूचे दुकान’, किंवा ‘मोक्ष विदेशी वाईन शॉप’ अशा नावांमधून संस्कृतीची थट्टा होत आहे. मोक्षाचा मार्ग जर दारूतून सापडतो, तर आम्हाला काहीच आक्षेप नाही… पण तो मोक्ष स्वतःपुरताच ठेवावा, सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा माजवू नये,” असं मुनगंटीवार म्हणाले.
💸 “दारूवर अर्थव्यवस्था नाही, जबाबदारी उभी असावी!”
मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं की, “होय, महाराष्ट्रात दरवर्षी १.२५ लाख कोटी रुपयांची दारू विकली जाते, हे सत्य आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की अर्थव्यवस्था फक्त दारूवर उभी आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर जबाबदारी आहे की समाजात संतुलन राखावं.”
📌 विधेयकाचा उद्देश काय?
या सुधारणा विधेयकाचा उद्देश म्हणजे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई, शिक्षेतील सुधारणा, आणि मुल्याधिष्ठित समाजनिर्मिती. दारूबंदीला पुन्हा लागू न करण्याची भूमिका कायम ठेवून, अनुशासनबद्ध दारू विक्री व सेवनासाठी नवे निकष घालण्यावर भर देण्यात आला आहे.