WhatsApp

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत घ्यावा – कृषी विभागाचे आवाहन

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
अकोला |
अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन 2025-26 साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.



राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेस प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप (११) व रब्बी (०५) हंगामातील एकूण १६ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून, तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे. पीकस्पर्धेतील पीके :- खरीप पीके :- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, रब्बी पीके :- ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस (एकूण ०५ पिके)

          अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख खरीप व रब्बी हंगामासाठी जाहीर करण्यात आली आहे. खरीप हंगामसाठी मूग व उडीद पिक असून यासाठी  ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज दाखल करता येतील. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल पिकांसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज दाखल करता येतील. रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पिकांसाठी दि. ३१ डिसेंबर २०२५ अर्ज दाखल करता येतील.

             पीकस्पर्धा विजेत्यांना बक्षिसाचे स्वरूप :- सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी बक्षिस तालुका स्तरावर  प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांकासाठी 5,000, 3,000, 2,000 तर जिल्हास्तरासाठी १०,०००, ७,००० व ५,००० तर राज्यपातळीवर ५०,०००, ४०,००० व ३०,००० असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, तसेच कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

सविस्तर मार्गदर्शक सूचना : www.krishi.maharashtra.gov.in   

Leave a Comment

error: Content is protected !!