अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
पूर्णिया (बिहार) – अंधश्रद्धा ही केवळ अज्ञान नव्हे, तर कधी कधी क्रूरतेचं मूळ बनते. अशीच एक रक्त गोठवणारी घटना रविवारी (दि. ६ जुलै) मध्यरात्री बिहारमधील रानीपतारा तेटगामा गावात घडली, जिथे एका कुटुंबावर चेटकीण असल्याचा आरोप करत स्थानिकांनी अमानुषपणे पाच जणांना जिवंत जाळलं. या घटनेनं केवळ पूर्णिया नव्हे, तर संपूर्ण बिहार हादरून गेला आहे.
👩👧👦 कोण होतं हे निर्दोष कुटुंब?
या हल्ल्यात सीतादेवी, तिचा पती, दोन मुले आणि तिच्या दीराचा समावेश होता. गावातील काही लोकांचं म्हणणं होतं की, गेल्या काही महिन्यांत चार-पाच मुलांचा मृत्यू झाला आणि त्यासाठी सीतादेवी जबाबदार आहे. तिच्यावर ‘चेटकीण’ असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. हीच अफवा अखेर पाच बळी घेऊन गेली.
🌃 मध्यरात्रीचा नरसंहार
रविवारी रात्री ३ वाजता, जमावाने सीतादेवीच्या घरावर धाव घेतली. झोपेत असलेल्या कुटुंबाला घराबाहेर ओढून एका तलावाजवळ नेण्यात आलं. तिथं त्यांना लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळलं.
ही हिंसक घटना इतकी क्रूर होती की, पाहणाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले. मग या जळलेल्या मृतदेहांना पोत्यात भरून तलावात फेकण्यात आलं, जेणेकरून गुन्ह्याचे कोणतेही पुरावे उरणार नाहीत.
👦 एकटाच वाचला सोनू कुमार!
या नरसंहारातून फक्त एकच जण सुदैवाने वाचला – १६ वर्षांचा सोनू कुमार. तो कसेबसे घटनास्थळावरून पळून गेला आणि थेट पोलिसांशी संपर्क केला. त्याने संपूर्ण घटनेची थरारक माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तलावाजवळ शोधमोहीम सुरू केली. मृतदेह हाती लागल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि गुन्हा नोंदवला.
👮♀️ तपास सुरू, दोन आरोपी ताब्यात
या घटनेमुळे पोलिस प्रशासनही हादरले आहे. पोलिस अधीक्षक अमित रंजन यांनी सांगितलं की, चार आरोपींची नावे पुढे आली असून त्यापैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीत असं समोर आलं आहे की, या हिंसाचारात गावातील अनेक जण सामील होते.
❗ अंधश्रद्धेचं जहाल विष
या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते – अंधश्रद्धा ही केवळ अज्ञान नाही, तर समाजघातकी वर्तनाचं कारण बनू शकते. ‘चेटकीण’ या शब्दाच्या आड लपून आजही महिलांवर होणारा अन्याय थांबलेला नाही. शिक्षण, विज्ञान आणि जागरूकता हाच यावर एकमेव उपाय आहे.
या भीषण घटनेनं बिहारमधील प्रशासनालाही धक्का दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने घटनेची गंभीर दखल घेतली असून दोषींवर जलदगती न्यायालयातून कठोर शिक्षा होईल असा विश्वास दिला आहे. एका अफवेच्या आड इतकी निर्दयता… आणि अजूनही अनेक गावांमध्ये अशाच घटना घडत आहेत, हे समाजाला खूप काही सांगून जातं.