अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
पुणे | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा यांचा आज पुणे दौरा असला तरी त्याचा थेट फटका पुणेकर नागरिकांना बसताना दिसत आहे. शहरात शहांच्या विविध कार्यक्रमांमुळे वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे अनेक प्रमुख रस्त्यांवर तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पुणे पोलिसांनी कार्यक्रमस्थळांवर सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली असून, रस्त्यांवर बॅरिकेडिंग, पोलिस बंदोबस्त आणि डायव्हर्जन्समुळे गाड्यांची गर्दी वाढली आहे. सकाळपासूनच सिंहगड रोड, कोथरूड, कोंढवा, खडकवासला परिसरात वाहनांची संथगती आणि लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. शाळा, ऑफिस, हॉस्पिटलकडे धावणाऱ्या लोकांनी यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.
अमित शहांचे आजचे कार्यक्रम काहीसे हे आहेत:
- सकाळी ११ वाजता श्रीमंत बाजीराव पेशवे प्रथम यांच्या प्रतिमेचे अनावरण खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परिसरात
- ११:३० वाजता NDA मध्येच प्रशिक्षणार्थींशी संवाद
- दुपारी १२ वाजता कोंढवा बुद्रुक येथील जयराज स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन
- २:१५ वाजता वडाची वाडी येथे PHRC हेल्थ सिटीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम
या सर्व कार्यक्रमांदरम्यान पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन वेगळ्या पद्धतीने राबवले आहे. मात्र नागरिकांचा आरोप आहे की त्यासंबंधी सुस्पष्ट सूचना वेळेत देण्यात आल्या नाहीत, त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
ट्रॅफिक डायव्हर्जन्सच्या झळा
कर्वेनगर, NDA रोड, कोथरूड डिपो, कोंढवा बुद्रुक, बिबवेवाडी आणि वडाची वाडी परिसरात सकाळपासूनच गाड्यांचे लांब रांगे लागले आहेत. बऱ्याच ठिकाणी लोकांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. काहींनी सोशल मीडियावर “VIP दौरे म्हणजे जनतेचा खोळंबा” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
पोलीस काय म्हणतात?
पुणे शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सुरक्षा कारणास्तव आणि माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमांच्या वेळा लक्षात घेऊनच मार्ग वळविण्यात आले आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.”
तथापि, पुढच्या वेळेस असे दौरे होणार असतील, तर वाहतूक मार्गांचे अपडेट्स वेळेत, स्पष्टपणे आणि अनेक माध्यमांतून देणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.