अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
पंढरपूर | आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे पाय पंढरीकडे वळले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्दीचा तुफान लोंढा आहे. मात्र यंदा ‘विशेष’ काही घडतंय — कारण सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी थेट आदेश काढून ‘व्हीआयपी दर्शन पास’वर बंदी घातली आहे.
आदेशानुसार, कोणत्याही मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी किंवा राजकीय कार्यकर्त्याला यंदा विशेष पासवरून दर्शन घेता येणार नाही. जर असा प्रयत्न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
🧎♂️ सामान्य भक्त रांगेत तिष्ठत… ‘व्हीआयपी’ मात्र सरळ गर्भगृहात? आता नाही चालणार!
दरवर्षी सणाच्या काळात हजारो भाविक दर्शनासाठी रात्रभर रांगेत थांबतात, उपवास करतात आणि विठोबाच्या भेटीसाठी प्रतीक्षा करतात. मात्र, राजकीय व शासकीय ओळख वापरून काही ‘व्हीआयपी’ व्यक्तींना थेट गर्भगृहात प्रवेश दिला जातो. हे पाहून सामान्य भाविकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होत होती.
शिपारस, दबाव, मोबाईल कॉल, पाठीवर हात ठेवणं – अशा क्लृप्त्या थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २०१० मधील राज्य शासनाच्या निर्णयाचा आधार घेत, यंदा पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे.
🛂 मंदिर प्रशासन, पोलिस, प्रांताधिकारी – सर्वांना निर्देश
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, कुठल्याही प्रकारे ‘व्हीआयपी’ पास जनरेट न करावेत.
जर कुणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, अथवा कोणतंही दुर्लक्ष केलं, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
📋 कायदा काय सांगतो?
राज्य शासनाने २०१० मध्येच निर्णय घेतला होता की, यात्रा, उत्सव, धार्मिक गर्दीच्या काळात कोणत्याही प्रकारची विशेष दर्शन व्यवस्था करता येणार नाही. हा निर्णय लागू असूनही मागील काही वर्षांत ‘व्हीआयपी’ पास गुपचूप पद्धतीने दिले जात होते.
या पार्श्वभूमीवर, यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी हा नियम कडक अंमलात आणला असून, प्रशासनालाही जबाबदारीनं वागण्याचे आदेश दिले आहेत.
🗣️ भाविकांनी दिला स्वागतार्ह प्रतिसाद
सामान्य भाविकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “आम्ही घंटानाद करत रांगेत उभे राहतो, पायाला फोडं होईपर्यंत चालतो. पण व्हीआयपी मंडळी सरळ जाऊन दर्शन घेतात, हे अपमानास्पद होतं”, असं अनेक वारकऱ्यांनी म्हटलं आहे.
🙏 आता ‘एकच रांग, एकच भक्ती!’
या निर्णयामुळे यंदाच्या आषाढी वारीत ‘सर्व भक्त समान’ हे वास्तवात उतरलं आहे. आता मंत्री असो किंवा सामान्य भाविक – प्रत्येकाला एकाच रांगेतून दर्शन घेणं अनिवार्य आहे. त्यामुळे विठोबाच्या नगरीत खऱ्या अर्थानं ‘साम्यतेचं’ दर्शन घडणार आहे!