अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नागपूर : सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला ‘आय लव्ह यू’ म्हणणं म्हणजे लैंगिक छळ किंवा विनयभंग मानता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकलपीठाने हा निर्णय देत सत्र न्यायालयाचा निकाल उलथवून लावला. या निर्णयामुळे कायद्यातील ‘हेतू’, ‘पुरावे’, आणि लैंगिक शोषणाच्या व्याख्येवर पुन्हा एकदा चर्चेचं वादळ निर्माण झालं आहे.
ही घटना आहे २०१५ मधील. नागपूरच्या एका शाळकरी मुलीने आपल्या वडिलांकडे तक्रार केली की, तिच्या शाळेपासून घरी जात असताना एका तरुणाने तिला अडवून तिचा हात धरला आणि ‘आय लव्ह यू’ म्हणत छेडछाड केली. वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (विनयभंग) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. २०१७ मध्ये सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
मात्र, आरोपीने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील केलं. न्यायालयाने साक्षीपुरावे, घटना घडण्याची पार्श्वभूमी, पोलिस तपास, आणि सरकारी पक्षाने मांडलेली बाजू यांचा सखोल विचार केल्यानंतर एक निर्णायक निष्कर्ष काढला — “फक्त ‘आय लव्ह यू’ म्हणणं म्हणजे लैंगिक हेतूने केलेली कृती ठरत नाही.”
‘आय लव्ह यू’ हे शब्द लैंगिक हेतूने वापरले गेले का?
न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केलं की, आरोपीच्या कृतीमागे कोणताही लैंगिक हेतू असल्याचे ठोस पुरावे नाहीत. फक्त एक व्यक्ती दुसऱ्याच्या विषयी प्रेम व्यक्त करत असेल, तर त्यास थेट विनयभंग म्हणून गणणे चुकीचे ठरेल. लैंगिक शोषणाच्या कायदेशीर व्याख्येनुसार, बळजबरीने शरीरसंपर्क, कपडे फाडणे, अश्लील स्पर्श, शारीरिक जबरदस्ती किंवा लज्जा भंग करणारे शब्द वापरणे ही कृती त्या चौकटीत बसते. मात्र, सदर घटनेत असा कोणताही कृतीशील पुरावा न आढळल्यामुळे आरोपीचा हेतू लैंगिक असल्याचे सिद्ध होत नाही, असं न्यायालयाने सांगितलं.
सरकारी पक्ष अपयशी; न्यायालयाचा दणका
या प्रकरणात सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सादर न केल्यामुळे न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. विशेषतः पीडित मुलीच्या कथनात आणि तिच्या वडिलांच्या तक्रारीत विसंगती असल्याचेही न्यायालयाने नोंदवले. अशा परिस्थितीत केवळ प्रेमाच्या शब्दांवर एखाद्या व्यक्तीला शिक्षा देणे, हे न्यायाच्या तत्वांना धरून नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सामाजिक प्रतिक्रिया – कायद्यात सुधारणा हवी का?
या निर्णयावर समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की, हा निर्णय पावित्र्याच्या नजरेने घेतलेला आहे आणि प्रेमाच्या अभिव्यक्तीला लैंगिक छळ ठरवण्याची गरज नाही. दुसरीकडे, काही महिला संघटनांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, अशा घटनांना न्यायालयीन पाठिंबा मिळाल्यास छेडछाडीला खतपाणी घालण्याचे काम होईल. ‘आय लव्ह यू’ हे प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम असू शकते, पण जेव्हा ते बळजबरीने, एखाद्याला घाबरवून, सार्वजनिक ठिकाणी आणि नकारानंतरही व्यक्त केलं जातं, तेव्हा ती कृती विनयभंगात मोडू शकते, असं म्हणणाऱ्यांचा सूर आहे.
या निर्णयाचा व्यापक परिणाम काय?
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आधार घेऊन यापुढे अनेक आरोपी न्यायालयात आपली बाजू मांडू शकतील. ‘हेतू’ हा घटक फार महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिस तपास आणि सरकारी पक्षाची कार्यक्षमता यावर अशा प्रकरणांतील निकाल ठरणार आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाला अधिक योग्य प्रशिक्षण देणे, पीडितांचे बयान अधिक स्पष्ट घेणे आणि साक्षी-पुरावे सशक्त करणे ही काळाची गरज ठरणार आहे.