अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. केवळ विचारधारेशी एकनिष्ठता, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत. सोबतीला उत्तम संवाद कौशल्य आणि स्वकर्तृत्व. या बळावर २५ वर्षांमध्ये एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशी राजकीय वाटचाल रवींद्र चव्हाण यांची राहिलीय. त्यांच्या रुपानं भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रासाठी नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्या विधानसभेत पोहोचले.युवा कार्यकर्ता ते मंत्री असा टप्पा त्यांनी पूर्ण केलाय. पक्षाचे सरचिटणीस, कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. कोकणच्या भाजप विस्तारामध्ये चव्हाण यांचा मोठा वाटा राहिलाय. आता प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळं कोकणातील भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे.
समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे असा सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला अपवाद ठरले ते रविंद्र चव्हाण. समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण ते दाखवण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं असतं आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची, अशी त्यांची आजपर्यंतची कार्यशैली राहिलेली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार रविंद्र चव्हाण यांच्या मनावर बिंबले. म्हणूनच त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामाकंन भरताना राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वत: हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो, अशी प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.