अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) जाहीर केलेल्या नव्या अपडेटनुसार, यंदा जुलै महिन्यात देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच, सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. यामुळे संपूर्ण भारतात मान्सूनची स्थिती चांगली राहणार असून, विशेषतः शेती क्षेत्रासाठी ही माहिती दिलासादायक मानली जात आहे.
जूनमध्येच पावसाने दिली हजेरी
मे महिन्यातच काही भागांत मान्सूनसदृश पाऊस झाला होता. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने थोडासा विश्रांती घेतली होती, पण नंतर मात्र महाराष्ट्रासह देशभरात पावसाने चांगला जोर पकडला. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये अपेक्षित प्रमाणाहून जास्त पाऊस झाल्याचे चित्र आहे.
मुंबई-पुण्यात सरासरी ओलांडली
मुंबईत जून महिन्यात ४९.७ मिलिमीटरने सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. तर पुण्यात १७३ मिलिमीटर एवढा सामान्य जून पाऊस असतो, पण यंदा २९ जूनपर्यंत २६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे शहरांच्या पाणीपुरवठ्यावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये पावसाची दुसरी इनिंग सुरू होणार
जुलै महिन्याच्या पहिल्या काही दिवसांत थोडासा विश्रांती घेतलेला पाऊस ५ जुलैनंतर जोर धरू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या महिन्यात महाराष्ट्रासह मध्य भारत, दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातही यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याची शक्यता आहे.
कृषी क्षेत्रासाठी दिलासादायक संकेत
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून कालावधीत १०६ टक्के सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक आहे. विशेषतः खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना जुलैच्या पावसामुळे मोठा फायदा होणार आहे. बियाणं पेरणी, निंदणी, खत व्यवस्थापनासाठी योग्य हवामान लाभदायक ठरणार आहे.
देशभरात मान्सून वेळेआधी पोहोचला
या वर्षी मान्सूनने देशात वेळेआधी आगमन केलं आणि त्यानंतर अपेक्षेपेक्षा वेगाने सर्व भागांमध्ये पसरला. त्यामुळे जून महिन्यातील पावसाने शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केलं आणि जलसाठ्यात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या वाढीव पावसामुळे जलाशय, बंधारे आणि शेततळ्यांमध्ये मुबलक पाणी साठा होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचे सतर्कतेचे आवाहन
जास्त पावसाचा अंदाज लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. विशेषतः डोंगराळ भाग, नदीनालेजवळील गावांमध्ये राहणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. प्रशासनानेही संभाव्य पूरस्थितीचा विचार करून पूर्वतयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.