अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या कथित वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्र विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नाना पटोले यांनी या विधानांचा निषेध करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सभागृहात माफी मागण्याची मागणी केली. त्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत पटोलेंनी केलेल्या “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही” या वक्तव्यामुळे वातावरण अधिकच चिघळले आणि शेवटी त्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले.
कृषीमंत्र्यांच्या विधानामुळे संतापाची ठिणगी
गेल्या काही दिवसांत कृषीमंत्री कोकाटे आणि लोणीकर यांनी केलेल्या विधानांनी शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी पावसाळी अधिवेशनात संताप व्यक्त करत, मुख्यमंत्री सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागा, अशी मागणी केली. मात्र यावेळी वातावरण तापत गेले आणि गोंधळ वाढत गेला.
“मोदी तुमचा बाप असेल…” – पटोलेंचं वादग्रस्त विधान
गोंधळाच्या दरम्यान पटोले यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही.” हे विधान ऐकून सत्ताधारी बाकांवरून जोरदार विरोध झाला. सभागृहाचं वातावरण तणावपूर्ण झालं.
अध्यक्षांकडे धाव घेतल्यामुळे वादात भर
या वक्तव्यानंतर नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाऊन जोरदार विरोध करत बोलू लागले. यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संताप व्यक्त करत पटोलेंना समज दिली. मात्र पटोले थांबले नाहीत. त्यामुळे पाच मिनिटांसाठी सभागृह स्थगित करण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांची माफीची मागणी आणि निलंबनाचा निर्णय
पुनः कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत नाना पटोलेंनी अध्यक्षांकडे धाव घेणं अशोभनीय असल्याचं सांगितलं. “एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे. पण अध्यक्षांकडे धाव घेणं प्रथमच पाहतोय. पटोले यांचं वागणं योग्य नाही, त्यांनी माफी मागावी,” असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर अध्यक्षांनी नाना पटोलेंना दिवसभरासाठी निलंबित केलं.
विरोधकांनी एक दिवसाचं कामकाज बहिष्कृत केलं
निलंबनाच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी एक दिवसासाठी विधीमंडळाचं कामकाज बहिष्कृत केलं. “शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आवाज उठवणाऱ्याला निलंबित केलं जातं, ही महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील लाजिरवाणी बाब आहे,” असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.