WhatsApp

घरगुती गॅस, रेल्वे तिकीट ते ATM शुल्क… १ जुलैपासून देशभरात ‘नवीन नियमराज’

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो
नवी दिल्ली :
जुलै महिन्याची सुरुवात नजीक आली आहे आणि या महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशात पाच महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. हे बदल सर्वसामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच प्रभावित करणार आहेत. घरातील एलपीजीपासून ते तुमच्या ATM वापरावर परिणाम करणाऱ्या या नियमांवर नजर टाकूया.




एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये संभाव्य बदल

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या व्यावसायिक व घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल करतात. जून महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात झाली होती, मात्र घरगुती गॅस सिलेंडरचे दर काही महिन्यांपासून स्थिर आहेत. मात्र, १ जुलैपासून या किमतीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दरवाढीचा थेट परिणाम घरातील स्वयंपाकाच्या खर्चावर होणार आहे. त्यामुळे १ जुलैपासून गृहिणींसह सर्वच घरमालकांचे बजेट कोसळण्याची शक्यता आहे.


HDFC क्रेडिट कार्ड वापर महागणार

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी नवीन शुल्क धोरण १ जुलैपासून लागू होणार आहे.
जर कोणी युटिलिटी बिल भरताना HDFC कार्डचा वापर करत असेल, तर त्यावर अतिरिक्त शुल्क लागू शकतो. त्याचबरोबर, जर एका महिन्यात ₹10,000 पेक्षा अधिक रक्कम डिजिटल वॉलेट्स (Paytm, Mobikwik, FreeCharge, Ola Money) मध्ये भरली, तर त्या व्यवहारावर १ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
या नियमामुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्या अनेक वापरकर्त्यांवर आर्थिक भार येण्याची शक्यता आहे.


ICICI बँकेच्या ATM आणि IMPS व्यवहारांचे नवीन दर

ICICI बँकेने देखील ग्राहकांसाठी ATM आणि IMPS व्यवहारांसंदर्भातील दरांमध्ये बदल जाहीर केला आहे.
मेट्रो शहरांमध्ये ATM मधून महिन्यात ५ वेळांहून अधिक पैसे काढल्यास प्रत्येकी ₹23 शुल्क लागेल. नॉन-मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा फक्त ३ वेळांची आहे.
त्याचबरोबर IMPS व्यवहारासाठीही शुल्क लागू होईल.

  • ₹1,000 पर्यंतच्या व्यवहारावर ₹2.50
  • ₹1,000 ते ₹1 लाख दरम्यान ₹5
  • ₹1 लाख ते ₹5 लाख दरम्यान ₹15 शुल्क आकारले जाईल.

भारतीय रेल्वेचे तिकीट व तात्काळ बुकिंग नियम बदल

भारतीय रेल्वेने १ जुलैपासून भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • नॉन-एसी मेल व एक्सप्रेस गाड्यांत प्रति किमी १ पैसा,
  • एसी वर्गासाठी प्रति किमी २ पैसे वाढ करण्यात येणार आहे.
    ५०० किमी पर्यंतच्या प्रवासात सवलत कायम असली तरी, त्यापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना अर्धा पैसा अधिक द्यावा लागणार आहे.

तसेच तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नविन अट लागू करण्यात आली आहे.
IRCTC च्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवरून फक्त आधार-व्हेरिफाइड वापरकर्तेच तात्काळ तिकीट बुक करू शकतील. त्यामुळे तातडीने प्रवास करणाऱ्यांसाठी ही अट महत्त्वाची ठरणार आहे.


दिल्लीतील जुनी वाहने इंधनविना; EOL वाहने बंद

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत प्रदूषण रोखण्यासाठी १ जुलैपासून १० वर्षांहून जुनी डिझेल वाहने व १५ वर्षांहून जुनी पेट्रोल वाहने (EOL – End of Life Vehicles) यांना पेट्रोल पंपांवर इंधन मिळणार नाही. CAQM च्या निर्णयानुसार, हे वाहने आता पंपावर इंधन भरण्यापासून वंचित राहतील. या निर्णयाचा उद्देश दिल्लीत हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आहे, मात्र अनेक वाहनधारकांना त्यांचा वाहन वापर थांबवावा लागणार आहे.


प्रत्येक खिशावर परिणाम करणारा जुलै!

या सर्व बदलांमुळे जुलै महिन्याची सुरुवातच आर्थिक भाराने होणार आहे, हे स्पष्ट आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचा परिणाम आता थेट ग्राहकाच्या वापरावर व खर्चावर दिसून येईल.
घरगुती स्वयंपाक, वाहनाचा वापर, बँक व्यवहार, रेल्वे प्रवास आणि डिजिटल व्यवहार यावर याचा स्पष्ट परिणाम होणार आहे. वापरकर्त्यांनी या बदलांची माहिती आधीच घेऊन आपले आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!