WhatsApp

काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी मुंबईत निधन

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो डेक्स दिनांक २८ जून २०२५ :- बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेली शेफाली जरीवाला हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.



शेफालीची प्रकृती अचानक खालावल्यामुळे तिचे पती पराग त्यागी यांनी तिला तात्काळ मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे.

२००२ मध्ये प्रदर्शित झालेलं ‘कांटा लगा’ हे गाणं तुफान गाजलं होतं. या रिमिक्स गाण्यातील बोल्ड अंदाजामुळे शेफाली जरीवाला एका रात्रीत घराघरात पोहोचली. मूळ गाणं १९६४ सालच्या ‘समझौता’ या चित्रपटातील असून, याचं संगीत कल्याणजी-आनंदजी यांनी दिलं होतं आणि गायिका लता मंगेशकर यांनी ते गायले होते. रिमिक्स व्हर्जनमुळे या गाण्याला नवं आयुष्य मिळालं आणि शेफालीला विशेष ओळख. (Shefali Jariwala Death)

शेफाली जरीवालाचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. तिनं संगणक अनुप्रयोग (Computer Applications) या क्षेत्रात पदवी घेतली होती. ‘कांटा लगा’ नंतर ती अनेक म्युझिक व्हिडीओज, रिअॅलिटी शोज आणि चित्रपटांमध्ये झळकली. ‘नच बलिए ५’ आणि ‘नच बलिए ७’ मध्येही तिचा सहभाग होता.

२०१९ मध्ये तिने ‘बिग बॉस १३’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. तिच्या मोकळ्या स्वभावामुळे आणि स्पष्ट बोलण्यामुळे प्रेक्षकांच्या ती लवकरच पसंतीस उतरली होती.

शेफालीचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेचं कारण ठरलं होतं. तिचं पहिलं लग्न २००४ मध्ये म्युझिक कंपोजर हरमीत सिंग (Meet Bros) याच्याशी झालं होतं, परंतु २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर २०१५ मध्ये तिने अभिनेता पराग त्यागी याच्याशी विवाह केला. दोघंही अनेक रिअॅलिटी शोजमधून एकत्र दिसले होते आणि त्यांचं नातंही सोशल मीडियावर चर्चेत होतं. (Shefali Jariwala Passes Away)

शेफालीच्या अकस्मात निधनामुळे तिचे चाहते, सहकारी कलाकार आणि संपूर्ण मनोरंजन क्षेत्र हळहळ व्यक्त करत आहे. तिचं आयुष्य अनेकांना प्रेरणादायक वाटलं – एका गाण्यामुळे रातोरात स्टार बनलेली, संघर्षातून उभी राहिलेली, आणि शेवटपर्यंत आत्मविश्वासाने जगणारी कलाकार.

Leave a Comment

error: Content is protected !!