WhatsApp


अकोल्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार उघड; सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा साठा पोलिसांच्या ताब्यात

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
अकोला :
शहरातील मलकापूर परिसरातून शासकीय स्वस्त धान्याचा साठा बार्शीटाकळी येथे गैरप्रकाराने वाहून नेत असताना सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एक ऑटो रिक्षा तसेच धान्यसाठा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून आणखी दोन ऑटो रिक्षांची चौकशी सुरू आहे.

मलकापूर परिसरातील शुक्ला यांच्या शासकीय स्वस्त धान्य दुकानातून मोठ्या प्रमाणावर धान्य भरून ते बार्शीटाकळी येथे पाठवले जात होते. ही हालचाल परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांना आढळल्यावर त्यांनी रिक्षा चालकास व दुकानदारास थांबवून डायल 112 वर माहिती देत खदान पोलिसांना पाचारण केले.

घटनास्थळी खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी तत्काळ दाखल झाले. सामाजिक कार्यकर्ते दिलीप भरणे, राजीव वगारे, प्रमोद धर्माळे, अजय पाटील व गोपाल मुळे यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेत धान्य भरलेला एक ऑटो रिक्षा पोलिसांच्या ताब्यात दिला.

याच वेळी आणखी दोन ऑटो रिक्षा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाल्या असल्या तरी त्यांच्या वाहन क्रमांकाची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावरही लवकरच तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

या प्रकारामुळे शासकीय धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघड झाला असून यामुळे शासनाचा धान्यसाठा गरजू नागरिकांऐवजी काळाबाजारात वळवला जात असल्याचा संशय बळावला आहे.

सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून संबंधित दुकान व अन्य सहभागी असलेल्या घटकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने अशा काळाबाजारीवर कठोर पावले उचलण्याची गरज असून, सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे हा प्रकार वेळेत हाणून पाडण्यात यश आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!