अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई : घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणि कार खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात ०.५% कपात केल्यामुळे बँकांनीही कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) या तीन सार्वजनिक बँकांनी थेट ०.५०% पर्यंत व्याजदर कमी करून ग्राहकांना जबरदस्त दिलासा दिला आहे.
या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि लघुउद्योग (MSME) कर्ज घेणाऱ्यांना आता मासिक हप्त्यांमध्ये मोठी बचत होणार आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीचा काळ ओलांडणाऱ्या सामान्यांसाठी ही व्याजदर कपात म्हणजे एक प्रकारचं “आर्थिक गिफ्ट” ठरत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात रेपो दर ६% वरून ५.५% वर आणला. त्याचबरोबर कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्येही १% कपात करण्यात आली. या निर्णयांमुळे बँकांकडे कर्ज देण्यासाठी अधिक पैसे उपलब्ध झाले आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे, जे ग्राहकांसाठी चांगली बातमी ठरते.
युनियन बँकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा
युनियन बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ईबीएलआर (External Benchmark Lending Rate) आणि आरएलएलआर (Repo Linked Lending Rate) मध्ये थेट ०.५०% कपात केली आहे. म्हणजेच युनियन बँकेचे ग्राहक आता घर, कार किंवा वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अधिक अनुकूल दरात पात्र ठरू शकतात.
इंडियन ओव्हरसीज बँकेचा निर्णय
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या मालमत्ता-दायित्व समितीने घेतलेल्या निर्णयानुसार, आरएलएलआर दर ८.८५% वरून थेट ८.३५% वर आणण्यात आला आहे. ही कपात तत्काळ लागू करण्यात आली असून, आधीपासूनचे ग्राहकही याचा फायदा घेऊ शकतील, विशेषतः जे कर्ज रेपो दराशी जोडलेलं आहे.
कॅनरा बँकेनंही दिला दिलासा
कॅनरा बँकेनेही रेपो आधारित व्याजदरात ०.५०% कपात केली असून, नवीन दर ८.२५% इतका आहे. यामुळे गृहकर्ज किंवा एमएसएमईसाठी कर्ज घेणाऱ्यांना नवीन योजना व आकर्षक दरांचा लाभ मिळणार आहे. हे दर बुधवारपासून लागू झाले आहेत.
इतर बँकाही करत आहेत तयारी
याआधी बँक ऑफ बडोदा ने देखील त्यांच्या आरएलएलआर दरात ०.५०% कपात केली होती. एचडीएफसी बँक या खासगी बँकेने आपल्या एमसीएलआर (MCLR) दरात ०.१०% कपात केली आहे. म्हणजे, भविष्यात आणखी बँका कर्ज स्वस्त करण्याच्या तयारीत असल्याचं संकेत मिळत आहेत.
ग्राहकांसाठी संधीचं वेळ आहे!
जर तुम्ही घर घेण्याचा, कार खरेदी करण्याचा, किंवा कोणत्याही प्रकारचं वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. कर्जाचे दर कमी असताना घेतलेलं कर्ज तुम्हाला दीर्घकाळात हजारो ते लाखो रुपयांची बचत करून देऊ शकतं.