अकोला जिल्ह्यासाठी अत्यंत दुःखद आणि अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील कपिलेश्वर (वडद) गावचे सुपुत्र, 12 मराठा इन्फंट्री रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले वीर सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने हे जम्मू-काश्मीरमधील पंचगाव परिसरात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी शहीद झाले.
मातृभूमीच्या रक्षणासाठी अखेरचा श्वास घेतलेल्या या शूर जवानाने आपल्या शौर्याने आणि कर्तव्यनिष्ठेने संपूर्ण अकोला जिल्ह्याला अभिमानाने मान उंचावली आहे. त्यांच्या वीरगतीची बातमी समजताच कपिलेश्वर (वडद) गावासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांनी देशसेवेचा सर्वोच्च आदर्श जपत आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे बलिदान हे केवळ कुटुंबापुरते न राहता संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या शौर्याची आठवण कायम देशवासीयांच्या मनात कोरली जाईल.
वीर जवानाचे अंत्यसंस्कार शुक्रवार, दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता, त्यांच्या मूळ गावी कपिलेश्वर (वडद), अकोला–मैसांग रोड येथे सैनिकी सन्मानात पार पडणार आहेत. यावेळी लष्करी अधिकारी, जिल्हा प्रशासन, आजी-माजी सैनिक, लोकप्रतिनिधी आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
वीर शहीद नायक वैभव लहाने यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अकोल्याचा हा सुपुत्र देशासाठी शहीद झाला असला, तरी त्यांचे बलिदान कायम अमर राहणार आहे.