WhatsApp

Farmer ID धारक शेतकऱ्यांना मिळणार ‘ही’ सुविधा मोफत; सरकारने घेतला मोठा निर्णय

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
अकोला : शेती क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत असलेली अनिश्चितता, हवामानातील बदल, पावसाचे वेळेवर न पडणे, अवकाळी पावसामुळे होणारे पीक नुकसान, गारपीट, अतिवृष्टी आणि सतत बदलणारे तापमान या सर्व गोष्टींमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहे. यामुळे उत्पादन घटते, खर्च वाढतो आणि नफ्याचे गणित बिघडते. हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘Farmer ID’ म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक योजना सुरू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. या ओळख क्रमांकाच्या आधारे सरकार शेतकऱ्याच्या शिवारावर थेट हवामानाची अचूक माहिती पोहोचवणार आहे. यामुळे शेतकऱ्याला पेरणी, खत व्यवस्थापन, फवारणी, कापणी याबाबत अचूक वेळ निवडता येणार आहे.



सध्या देशात ६.५ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे डिजिटल Farmer ID तयार झाले आहेत. या ID मध्ये शेतकऱ्याचं नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, त्याच्या मालकीची जमीन, पिकांची माहिती, शेतीचे क्षेत्र, जिल्हा, तालुका, गाव, शिवाराचे नाव, इत्यादी सर्व महत्त्वाची माहिती एकत्रित केली आहे. या डेटाचा उपयोग करून हवामान खातं संबंधित गावासाठी हवामानाचे अपडेट्स तयार करतं आणि त्यानंतर ही माहिती थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवर पाठवली जाते. ही माहिती स्थानिक भाषेत, म्हणजेच शेतकऱ्याला समजेल अशा पद्धतीने दिली जाते. यामध्ये पुढील काही दिवसांत होणारा पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, विजेची शक्यता, अशा बाबींचा समावेश असतो.

या सुविधेमुळे शेतकऱ्याला वेळेवर पेरणी करता येते. उगम काळात पिकासाठी पाण्याची किती गरज आहे, यावरही लक्ष देता येतं. उदाहरणार्थ, जर पाऊस येणार असेल तर सिंचन थांबवता येतं. फवारणी करताना जर वाऱ्याचा वेग जास्त असेल किंवा पाऊस येणार असेल तर फवारणी टाळता येते. यामुळे केवळ वेळ वाचत नाही, तर रासायनिक फवारणीचा खर्च देखील कमी होतो. शेतकऱ्याला त्याच्या पिकांचे संरक्षण करण्याची पूर्वतयारी करता येते. पिकांची देखभाल करता येते आणि अशा प्रकारे निसर्गाच्या अनिश्चिततेवर नियंत्रण ठेवता येते.

Farmer ID चा वापर भविष्यात केवळ हवामानाच्या माहितीपुरताच मर्यादित राहणार नाही, तर ही ओळख सरकारी योजना, पीकविमा, खत-बियाण्याचे अनुदान, डिजिटल कृषी मार्केट, ऑनलाईन प्रशिक्षण, कृषी कर्ज सुविधा, शासकीय परिपत्रकांचे अपडेट्स, अशा विविध योजनांसाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा अधिक पारदर्शकपणे व तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येणार आहेत.

Watch Ad

शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर AgriStack, Kisan Suvidha, या अधिकृत अ‍ॅप्सद्वारे Farmer ID लिंक करणे गरजेचे आहे. जर कोणी शेतकरी Farmer ID साठी अद्याप नोंदणीकृत नसेल, तर त्यांनी आपल्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा कृषी सहायकाच्या मदतीने ही नोंदणी करून घ्यावी. कारण भविष्यातील सर्व शासकीय योजना आणि फायदे याच ओळख क्रमांकावर आधारित असतील.

Leave a Comment

error: Content is protected !!