अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
मुंबई/कोलकाता/अहमदाबाद: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियासमोरील तांत्रिक अडचणी कायम आहेत. वाढीव सुरक्षा तपासणीमुळे बोइंग ७८७ ड्रीमलायनरच्या उड्डाणांना विलंब होत असून, मंगळवारी नऊ विमाने रद्द करण्याची वेळ आली. तांत्रिक बिघाड, विमानांची कमी उपलब्धता आणि खराब हवामान यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे. विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाच्या ३३ बोइंग ७८७ विमानांच्या अतिरिक्त देखभाल तपासणीचे निर्देश दिले आहेत. पर्यायी व्यवस्था आणि तिकीट परताव्याची हमी देण्यात आली असली, तरी प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
दुसरीकडे, लुफ्थांसा कंपनीच्या फ्रँकफर्टहून हैदराबादकडे निघालेल्या एलएच ७५२ विमानाला बॉम्बच्या धमकीमुळे हैदराबादमध्ये उतरण्यास नकार देण्यात आला. २० तासांच्या प्रवासानंतर हे विमान पुन्हा फ्रँकफर्टला परतले. १५ जून रोजी हैदराबाद विमानतळावर बॉम्बचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच, कोचीहून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी सकाळी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. तपासणीत काहीही संशयास्पद न आढळल्याने विमान दुपारी ३:१० वाजता दिल्लीकडे रवाना झाले. बॉम्बच्या धमकीमुळे हवाई वाहतुकीतील गोंधळ वाढला आहे.