WhatsApp


सूर्यप्रकाशासाठी लावलेले पोल… चोरीस गेले, पण सत्याच्या उजेडात चोर सापडले! पिंजर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवघ्या दोन दिवसांत सौर प्रकल्प चोरी उघड

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिलीप जाधव प्रतिनिधी बार्शीटाकळी दिनांक १ जून :- सूर्यप्रकाश देणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पावर काळाकुट्ट सावली टाकणाऱ्या चोरट्यांना पिंजर पोलिसांनी दोन दिवसांतच जेरबंद केलं आहे. भेंडी महाल परिसरातून चार किलोमीटर लांब ॲल्युमिनियमच्या तारांची चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या भेंडी महाल शिवारात सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी भेंडी महाल ते पिंजर या रस्त्यावर नव्याने इलेक्ट्रिक पोल उभारण्यात आले आणि त्यावर ॲल्युमिनियमचे विद्युततार जोडण्यात आले. मात्र या विकासकामावर अंधार पसरवण्याचा प्रयत्न केला अज्ञात चोरट्यांनी. सुमारे चार किलोमीटर अंतरावरील वायर – ज्याची अंदाजे किंमत वीस हजार रुपये होती – ही चोरी गेल्याची तक्रार प्रकल्पाचे समन्वय अधिकारी नरसिंग ठाकूर यांनी पिंजर पोलिसात दाखल केली. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरीसाठी बोलेरो पिकअपसारखे वाहन आणि कटर वापरले होते.

या तक्रारीनंतर पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे आणि त्यांच्या टीमने ही केस प्राधान्याने घेतली आणि अवघ्या दोनच दिवसांत तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं. सागर सूर्यवंशी, प्रणव पटेल आणि अमर अनारसे या तिघांना पिंजर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. पोलिसांनी चोरट्यांकडून बोलेरो पिकअप (किंमत सुमारे ४ लाख), वायर (२० हजार) आणि दोन कटर (५०० रुपये) असा एकूण ४ लाख ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हे संपूर्ण प्रकरण गुप्त माहितीवर आधारित असून, हेडकॉन्स्टेबल सुभाष उघडे, चंद्रकांत गोरे आणि पोलीस कर्मचारी नरहरी देवकते, रोशन पवार, कुणाल डोंगरे यांनी तपासात सक्रिय सहभाग घेतला. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पिंजर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक सर्वत्र होत आहे. गावकऱ्यांनीही पोलिसांप्रती विश्वास व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!