अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक, २६ मे २०२५ : अकोल्यातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची व उत्साहवर्धक बातमी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO Akola) दुचाकी वाहनांसाठी नवी क्रमांक मालिका सुरू करण्यात आली असून, वाहनप्रेमींसाठी आकर्षक ‘व्हीआयपी’ क्रमांक मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ही नवी मालिका फक्त दुचाकी वाहनांसाठी असून, चारचाकी वाहनांसाठी देखील विशेष शुल्क भरून पसंतीचे नंबर प्राप्त करता येतील.
प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लिलाव प्रक्रियेसाठी अर्ज घेण्याची अंतिम तारीख २७ मे असून इच्छुक अर्जदारांनी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० दरम्यान आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची प्रक्रिया अशी आहे:
अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज भरावा.
अर्जासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड, व रहिवाशी दाखला (साक्षांकित प्रतीसह) जोडावेत.
हे सर्व दस्तऐवज बंद लिफाफ्यात रोख विभागात जमा करावेत.
लिफाफ्यावर वाहनधारकाचे नाव, वाहनाचा प्रकार, पसंतीचा क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.

लिलावाची प्रक्रिया:
एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास अर्जदारांची यादी फलकावर लावण्यात येईल.
लिलावाची अंतिम तारीख २८ मे असून, त्यादिवशी दुपारी २.३० वाजेपर्यंत डिमांड ड्राफ्ट (DD) स्वीकारण्यात येतील.
त्याच दिवशी दुपारी ४ वाजता, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दालनात लिलाव होणार आहे.
लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांनी दोन डीडी तयार ठेवावेत:
- मूळ विहित शुल्काचा डीडी
- लिलावासाठी अतिरिक्त बोली रकमेचा डीडी
महत्त्वाची अट: डीडी केवळ राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा आणि तो RTO Akola या नावाने देण्यात यावा.
तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे:
एका क्रमांकासाठी अधिक अर्ज असल्यास, समान बोली रकमेच्या स्थितीत चिठ्ठीद्वारे क्रमांक निवड करण्यात येईल.
अर्जदारांचे पत्ते अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील असणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असून, सर्व अर्जदारांना संधी मिळावी यासाठी नियमानुसार लिलाव होणार आहे.
RTO अकोला मार्फत सुरू होणारी ही नवी मालिका केवळ वाहनधारकांची सोय वाढविणारी नसून, व्हीआयपी क्रमांक मिळविण्याची खास संधी देखील देणारी आहे. आकर्षक नंबरसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता लक्षात घेता, इच्छुकांनी वेळेत अर्ज करून सहभाग नोंदवावा.