अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २२ मे :- महाराष्ट्र राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात पोलिस अधीक्षक पदावर नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहराचे पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांची अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याआधी अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले बच्चन सिंह यांची बदली समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ४, नागपूर येथे करण्यात आली आहे.
बच्चन सिंह यांनी अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पोलिस दलातील कार्यक्षमतेवर भर दिला आणि स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली अकोला पोलिसांनी अनेक महत्त्वपूर्ण कारवाया केल्या होत्या.

नवीन पोलिस अधीक्षक अर्चित चांडक हे नागपूर शहरात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी नागपूर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या होत्या. त्यांच्या अनुभवाचा फायदा अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या बदल्यांमुळे अकोला जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी नागरिकांमध्ये अपेक्षा आहे. नवीन पोलिस अधीक्षक अचित चांडक यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.