अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दि.२२ : नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या इशाऱ्यानुसार दि. २२ ते २५ मे या कालावधीत व-हाडातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होऊन पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. Weather forecast

या काळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि विजा यासह पावसाचा जोर दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. जनावरांना झाडांखाली किंवा विजेच्या तारांच्या जवळ बांधू नये. पावसाच्या आणि वीजांच्या संकटापासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडांखाली थांबणे टाळावे, मोबाईल फोनचा वापर वीज चमकत असताना करू नये, तसेच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल व उपकरणे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून योग्य उपाययोजना करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.