अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २४ एप्रिल २०२५:-काही दिवसापूर्वी पातुर शहरातील मुजावरपूर येथील सैय्यद जाकीर सैय्यद मोयुद्दीन यांची धारदार शस्त्राने हत्या झाली होती त्यामध्ये पातुर पोलिसांनी दोन ते तीन आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक केली असून आरोपीने गुन्हा कबूल केला आहे मात्र सदरहत्तेमध्ये आणखी आरोपी असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वडिलांच्या हत्येचा तपास सीआयडी विभागाकडे देण्यात यावा अशी मागणी मृतक सय्यद जाकीर सैय्यद मोयुद्दीन यांचे यांच्या मुलगा सैय्यद शाकीर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे
सविस्तर वृत्त असे आहे की शिर्ला ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुजावरपुरा येथील शेतकरी सैय्यद जाकीर यांची हत्या ही सामान्य कारणाने झालेली नसून, गोवंश चोरीचे रॅकेट उघडकीस येऊ नये म्हणून पाच ते सहा आरोपींनी संगनमत करून नियोजनबद्ध कट रचल्याचा संशय मृताच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अनेक दिवस वडिलांवर पाळत ठेवत योग्य क्षणाची वाट पाहत निर्घृण हत्या केली. या प्रकरणात अटक झालेल्या काही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी या गुन्ह्याच्या मुळाशी असलेले रॅकेट अद्याप पोलिसांच्या तपासातून दूरच आहे, असा गंभीर आरोप करत मृताचे पुत्र सैय्यद शाकीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीआयडीमार्फत सखोल तपासाची मागणी केली आहे.
सैय्यद शाकीर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे वडील सैय्यद जाकीर हे पातुर शिवारातील आपल्या शेतीत दररोज गायी-गुरांना चारापाणी करण्यासाठी जात असत. 12 मार्च 2025 रोजी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले मात्र रात्री उशीरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता तुळजापूर रस्त्यालगत गोठ्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ त्यांचा पाण्याचा डबा आणि थैली व्यवस्थित ठेवलेली होती, मात्र त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने अनेक घाव केलेले होते.
या हत्येप्रकरणी पातुर पोलीस ठाण्यात एफआयआर क्र. 0113/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1) आणि 238(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला इजरार खान मुकद्दर खान याच्यावर संशय घेत तक्रार दाखल करण्यात आली, पोलिसांना दिलेल्या जबानी मध्ये अल्तमश खान, शहजाद खान, नवाज शाह व हमीद खान अशी इतर आरोपींची नावे पोलिसांना सांगण्यात आली . या आरोपींनी काही अंशी गुन्ह्याची कबुली दिली असली तरी मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट असल्याचा आरोप मृतकाच्या मुलाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. हत्या झाली त्या ठिकाणी फारसे रक्त सांडले नसल्यामुळे मृतदेह इतरत्र मारून गावठाण परिसरात आणून टाकल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही त्यांची तपासणी करण्यात आलेली नाही, ही गंभीर दुर्लक्षाची बाब असल्याचे सैय्यद शाकीर यांनी नमूद केले.
गोवंश चोरीविरोधात वारंवार तक्रार केल्याने हत्या
मुजावरपुरा येथील शेतकरी सैय्यद जाकीर यांची हत्या गोवंश चोरीविरोधात वारंवार तक्रारी केल्याने केली गेली, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांचा विश्वास आहे की, आरोपींनी गोवंश चोरीचे रॅकेट उघड होऊ नये म्हणून पुरावे नष्ट करण्याचा उद्देश ठरवून ही हत्या केली. मृताचे पुत्र सैय्यद शाकीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीआयडीमार्फत सखोल तपासाची मागणी केली आहे, ज्यामुळे मुख्य आरोपींना पकडून योग्य न्याय मिळवता येईल.
प्रतिक्रिया
“माझ्याकडे अशा प्रकारचे कोणतेही निवेदन किंवा अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे सध्या या प्रकरणावर भाष्य करणे संयुक्त होणार नाही. मात्र, संबंधित कागदपत्रे माझ्याकडे आल्यानंतर तपासाअंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल,”
हनूमंत डोपेवाड, ठाणेदार पातुर