अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक: १५ एप्रिल २०२५:-राज्याच्या प्रगततेच्या दिशेने टाकलेले आणखी एक भक्कम पाऊल म्हणून १६ एप्रिल २०२५ या दिवशी अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC)च्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. निमंत्रणांची पाठवणी सुरु झाली असून, राज्यभरातील मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (MADC) अंतर्गत उभारण्यात आलेले अमरावती विमानतळ हे विदर्भातील हवाई संपर्क वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. MADCने याला “प्रवासातील महत्त्वाचा मैलाचा दगड” असे संबोधले आहे. अमरावती जिल्ह्यासह अकोला, यवतमाळ, वाशीम या शेजारील जिल्ह्यांसाठीही हा विमानतळ लाभदायक ठरणार आहे.

मुंबई – अमरावती विमानसेवा १६ एप्रिलपासून सुरू
या विमानतळाचे उद्घाटन होताच, अलायन्स एअर या विमान कंपनीच्या माध्यमातून मुंबई- अमरावती – मुंबई ही विमानसेवा सुरू होणार आहे. १६ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता पहिले विमान मुंबईहून उड्डाण घेणार असून, सकाळी ११.३० वाजता अमरावतीहून परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल.
विमानसेवेचे वेळापत्रक
अलायन्स एअरची ही सेवा आठवड्यातून तीन दिवस – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार – उपलब्ध असणार आहे. १८ एप्रिलपासून वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून, त्यानुसार विमान दुपारी २.३० वाजता मुंबईहून अमरावतीकडे निघेल. अमरावतीत ते ४.१५ वाजता पोहोचेल आणि ४.४० वाजता मुंबईसाठी परतीचा प्रवास सुरू होईल. मुंबईत ते सायंकाळी ६.२५ वाजता पोहोचेल.
प्रादेशिक संपर्क योजना अंतर्गत विमानसेवा
ही विमानसेवा केंद्र सरकारच्या प्रादेशिक संपर्क योजना (UDAN – Ude Desh ka Aam Nagrik) अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. ATR-72 प्रकारचे प्रवासी विमान या मार्गावर कार्यरत असणार आहे. UDAN योजनेचा उद्देश छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडणे हा असून, अमरावती विमानतळ त्याचा उत्तम नमुना ठरणार आहे.
भव्य उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मीडिया प्रतिनिधींनाही ई-मेलद्वारे निमंत्रण देण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाने उद्घाटनासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे.
अमरावतीच्या विकासासाठी नवा अध्याय
हा विमानतळ सुरू झाल्याने केवळ अमरावती जिल्ह्याचाच नाही, तर विदर्भाच्या एकूण विकासालाच गती मिळणार आहे. औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि पर्यटन क्षेत्रासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. मुंबईशी थेट हवाई संपर्क झाल्याने वेळ आणि श्रम वाचणार असून, स्थानिक उद्योजक व व्यावसायिक यांना मोठा फायदा होणार आहे.
विमानतळाची वैशिष्ट्ये आणि सुविधा
अमरावती विमानतळ हे आधुनिक सुविधा असलेले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध आहे. प्रवाशांसाठी स्वागत कक्ष, विश्रांतीगृह, पार्किंग, वाहतूक व्यवस्था, तसेच तांत्रिक दृष्टीने सुसज्ज अशी धावपट्टी आणि नेव्हिगेशन सिस्टम यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘हे फक्त सुरुवात आहे’ – MADC
अमरावतीने आता हवाई नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे! आकाश हे मर्यादा नाही, तर नव्या संधींचा प्रारंभ आहे. भव्य उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रहा आणि महाराष्ट्राच्या प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाच्या साक्षीदार बना.”
नवीन युगाची सुरुवात
अमरावती विमानतळाचे उद्घाटन हा केवळ एका इमारतीचा शुभारंभ नसून, संपूर्ण विदर्भाच्या विकासाचा दालन उघडण्याचा क्षण आहे. सरकारच्या पुढाकाराने आणि स्थानिक जनतेच्या सहकार्याने हा प्रकल्प साकार झाला आहे. आता या मार्गावर अधिक विमान कंपन्या आणि नव्या मार्गांची भर पडण्याची शक्यता आहे.
अमरावतीच्या उड्डाणाला गती मिळाली असून, आता संपूर्ण विदर्भ प्रगतीच्या आकाशात भरारी घेण्यास सज्ज झाला आहे.
