अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १५एप्रिल २०२५:- अकोट वन विभागातील चोहोट्टा बाजार, कुटासा, परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि वृक्षतोड करणाऱ्यांची संभाव्य मिलीभगत असल्याची जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये रंगत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने वृक्षतोडीसाठी योग्य संधी समजून काही टोळ्या सक्रिय झाल्या असून, बेसुमार झाडांची कत्तल सुरू.
चोहोट्टा बाजार परिसर हा अकोट वन परिक्षेत्रांतर्गत येतो.मागील काही दिवसांपासून या परिसरात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, सकाळी लवकर किंवा रात्रीच्या वेळी झाडे कापून ती वाहतूक केली जात आहे. अनेकदा वाहनांद्वारे झाडांची लाकूड वाहतूक करताना आढळून आली आहेत. तरीही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संशय अधिक गडद होत चालला आहे. झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल होऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याने यामागे आर्थिक व्यवहारांची शंका बळावली आहे.
सध्या उन्हाळा असल्याने जंगलातील शेतकऱ्यांचे रहदारीं संख्या कमी झाल्याने झाडे सहज तोडता येतात. याचा फायदा घेत काही अवैध वृक्षतोड करणारे टोळके जंगलात मोकळेपणे वावरत आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकार दिवसाढवळ्या होत असूनही कोणतीही कारवाई न होणे ही बाब अधिक चिंताजनक आहे.
स्थानिकांनी अनेक वेळा वन विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला, तरी कुठलाही ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने वन विभाग आणि अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये हातमिळवणी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

“वरिष्ठ अधिकारी मुकदर्शक का?”
या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे अकोट वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन.काही अधिकारी वृक्षतोड करणाऱ्यांना पाठिशी घालत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे वनप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थ म्हणाले, “रोज झाडे कापली जात आहेत. आम्ही अनेक वेळा वन खात्याला कळवले, पण कोणताच प्रतिसाद मिळत नाही. झाडांची नासधूस थांबविण्यासाठी जर खात्यानेच दुर्लक्ष केले, तर सामान्य नागरिकांनी काय करावे?”
अवैध वृक्षतोड ही केवळ कायद्याचे उल्लंघन नसून नैसर्गिक संपत्तीचा विनाशही आहे. झाडांची बेसुमार कत्तल झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध वृक्षतोडीच्या या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विशेषतः वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याने चोहोट्टा बाजार परिसरातील ही अवैध वृक्षतोड केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर पर्यावरणावर गदा आणणारा गंभीर प्रकार आहे. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा, भविष्यात त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण अकोट तालुक्याला भोगावे लागतील.
