अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १५ एप्रिल २०२५:- सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाने चांगलाच कहर केला आहे. अकोट तालुक्यातही उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा कडक उन्हात प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः अकोट-अकोला मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सध्या प्रचंड गैरसोय होत असून, या मार्गावर अजूनही योग्य बसथांब्यांची उभारणी झालेली नाही. परिणामी प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उन्हात उभे राहून बसची वाट बघावी लागत आहे.
एप्रिलच्या सुरुवातीला तापमानाचा पारा चढू लागल्याने यावर्षीही याला अपवाद नाही. ४३अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेल्या तापमानात नागरिकांचे हाल सुरू आहेत. अकोट-अकोला मार्ग हा अतिशय महत्त्वाचा आणि दळणवळणासाठी वापरला जाणारा मार्ग आहे. या मार्गावर अनेक लहान-मोठी गावे येतात. परंतु या गावांच्या फाट्यावर कोणताही प्रवाशी निवारा नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात ताटकळत बसची वाट पाहणे भाग पडते.
प्रवाशी निवारे नसल्यामुळे नागरिकांना हॉटेलच्या छपरांखाली, झाडांच्या सावलीत किंवा थंडपेय विक्री करणाऱ्या दुकानांच्या समोर उभे राहून थांबावे लागते. काही प्रवासी तर डोक्यावर ओढणी, रुमाल ठेवून ऊन टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु यामध्ये लहान मुले, वृद्ध, अपंग व्यक्ती आणि आजारी रुग्ण यांना खूप त्रास सहन करावा लागतो. एकीकडे ऊन, दुसरीकडे अनियमित बसफेऱ्या, यामुळे प्रवाशांचे हाल अक्षरशः सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहेत.
सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी अकोट व अकोला शहरात दररोज प्रवास करतात. परंतु सकाळी किंवा दुपारी घरी परतताना त्यांना उन्हातच उभे राहून बसची वाट पहावी लागते. काही वेळेस बसेस वेळेवर येत नाहीत. त्यामुळे मुलांना उन्हात तासन्तास उभे राहावे लागते. यामुळे त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे.
या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. विशेषतः वृद्ध नागरिकांना उभे राहणे शक्य होत नाही. तरीही त्यांना रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी कोणतेही बाक, सावली किंवा निवारा नसल्यामुळे तीव्र त्रास सहन करावा लागतो. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
