WhatsApp

ATM Security Akola :-अकोल्यातील एटीएम केंद्रे सुरक्षारक्षकाविना; चोरट्यांना खुले आमंत्रण?

Share

अकोला न्यज नेटवर्क ब्युरो दिनांक १४ एप्रिल २०२५:- अकोला शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या एटीएम केंद्रांमध्ये सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक एटीएम केंद्रांवर ना सुरक्षारक्षक आहेत, ना सुरक्षिततेची कोणतीही ठोस व्यवस्था. परिणामी, या केंद्रांतून रोख रक्कम काढणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या बँकांच्या सुट्यांमुळे एटीएमवरील ताण अधिकच वाढणार असल्याने, गैरप्रकारांची शक्यता अधिक आहे.



शहरातील अनेक एटीएम केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी असते. मात्र, ही केंद्रे पूर्णपणे सुरक्षारक्षकांविना चालवली जात आहेत. यामुळे कोणताही व्यक्ती थेट एटीएममध्ये प्रवेश करू शकतो. एखादा व्यक्ती पैसे काढत असताना दुसरा कोणीही आत येऊन, त्याच्यावर हल्ला करून रोख रक्कम हिसकावून पळून जाऊ शकतो. ही अत्यंत चिंताजनक आणि धोकादायक बाब आहे.

बँकांना सुट्या, एटीएमवर प्रचंड ताण

एप्रिल महिन्यात बँकांच्या सलग सुट्या लागल्याने ग्राहकांना व्यवहारासाठी एटीएमकडेच वळावे लागत आहे. परिणामी, शहरातील बहुतेक एटीएम केंद्रांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. काही केंद्रांवर तर रात्रभर नागरिक पैसे काढण्यासाठी येत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, या केंद्रांवर रात्रीच्या वेळी सुरक्षेची पूर्णपणे वानवा असल्यामुळे ही वेळ अधिकच धोकादायक ठरते.

Watch Ad

अलीकडच्या काही दिवसांमध्ये एटीएम केंद्रांवर चोरी, जबरी चोरी किंवा एटीएम तोडण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी नागरिकांना धमकावून पैसे हिसकावून घेण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्व प्रकारांना कारणीभूत ठरत आहे ती म्हणजे सुरक्षा रक्षकांची अनुपस्थिती.

सुरक्षा रक्षक नेमणे ही बँक व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, मात्र बहुतांश बँका केवळ दिवसाच्या काही तासांमध्येच सुरक्षारक्षक ठेवतात. अनेक वेळा रात्रीच्या सत्रात किंवा सुट्ट्यांच्या दिवशी एटीएम पूर्णपणे बेवारस असते. यावरून बँक प्रशासनाची असंवेदनशीलता स्पष्ट होते. “जर एवढी अनास्था असेल, तर ग्राहकांच्या सुरक्षेचं ओझं कोण उचलणार?” असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

अकोला शहरातील पोलिस प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अनेक प्रमुख चौक, रस्ते आणि रहदारीच्या ठिकाणी असलेली एटीएम केंद्रे सतत निरीक्षणाखाली ठेवावीत, सीसीटीव्हीच्या मदतीने देखरेख करावी. पोलिसांनी एटीएम सेंटरच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करून संबंधित बँकांना नोटीस देण्याची आवश्यकता आहे.

अकोला शहरात सुरक्षारहित एटीएम केंद्रे ही एक मोठी समस्या बनली आहे. वाढत्या आर्थिक व्यवहारांमध्ये एटीएमची भूमिका महत्त्वाची आहे, पण त्याचबरोबर ग्राहकांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे बँक प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि नागरी समाज यांनी मिळून या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यातील गैरप्रकार रोखणे अशक्य होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!